कारवाईचा धडाका सुरूच; व्यापारी, रहिवाशांनी स्वत:हून साहित्य हटविले
ठाणे शहरातील माजिवाडा नाका ते गांधीनगर या पोखरण रस्ता क्रमांक-२ वरील वाहतूक कोंडी भेदण्यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. या कामात अडसर ठरणारी ११०० बांधकामे हटविण्याची कारवाई महापालिकेने सोमवार आणि मंगळवारी अशा दोन दिवसांत केली. पहिल्या दिवशी या मार्गावरील शेकडो नागरिकांनी स्वत:हून बांधकामे काढली होती. त्यानंतर सलग दोन दिवस येथे कारवाईचा धडाका सुरू करण्यात आला. या कारवाईनंतर आयुक्त जयस्वाल यांनी रुंदीकरणासंबंधीची पुढील कामे तातडीने करण्याचे आदेश दिले आहेत.
ठाणे शहरातील वाहतुकीसाठी महत्वाचा मानल्या जाणाऱ्या कॅडबरी ते शिवाईनगर या पोखरण रस्ता क्रमांक-१ च्या रुंदीकरणाचे काम महापालिकेने सुरू केले आहे. असे असतानाच याच रस्त्याला समांतर असलेल्या माजिवाडा नाका ते गांधीनगर या पोखरण रस्ता क्रमांक-२ च्या रुंदीकरणाचे कामही महापालिकेने हाती घेतले आहे. पोखरण रस्ता क्रमांक-१ प्रमाणेच या मार्गावरही मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ लागली होती. ही कोंडी भेदण्यासाठी महापालिकेने या रस्त्याच्या रुंदीकरणाचेही काम हाती घेतले आहे. या रुंदीकरणाच्या कामामध्ये रस्त्यालगतची अनेक बांधकामे तोडावी लागणार असल्यामुळे आयुक्तांनी संबंधित व्यापाऱ्यांना बांधकामे रिकामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, गेल्या दोन दिवसांपासून साहित्य इतरत्र हलविण्याचे काम व्यापाऱ्यांकडून सुरू होते. सोमवारी ही बांधकामे रिकामी होताच पालिकेने त्यांच्यावर हातोडा मारला.
या कारवाईत जवळपास ८०० बांधकामे तोडण्यात आली. पाच जेसीबी, एक पोकलेन आणि सुमारे शंभर मनुष्यबळाच्या साहाय्याने पूर्णत: तोडून टाकण्यात आली. कारवाईदरम्यान आयुक्त संजीव जयस्वाल यांनी परिसराचा पाहणी दौरा केला. अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब यांच्या उपस्थितीमध्ये अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अशोक बुरपल्ले, उपनगर अभियंता राजन खांडपेकर, साहाय्यक आयुक्त छाया मानकर, मारुती गायकवाड, कार्यकारी अभियंता नितीन पवार, नितीन येसुगडे, देवेंद्र नेर यांनी ही कारवाई केली.