अल्पवयीन मुला-मुलींपेक्षा सज्ञान व्यक्तींची संख्या जास्त; प्रौढांच्या बेपत्ता होण्यामुळे पोलीस दलासमोर नवीन आव्हान
गेल्या काही दिवसांत नालासोपाऱ्यातून तीन कुटुंबांतील १५ जण बेपत्ता होण्याच्या वेगवेगळय़ा घटनांनी गूढवलय निर्माण केले असतानाच गेल्या वर्षभरात वसई-विरार शहरातून तब्बल एक हजारहून अधिक जण बेपत्ता झाल्याचे उघड होत आहे. विशेष म्हणजे, यामध्ये अल्पवयीनांपेक्षा सज्ञान किंवा प्रौढ व्यक्ती बेपत्ता होण्याची संख्या कितीतरी जास्त आहे. एकीकडे, बेपत्ता अल्पवयीनांच्या शोधासाठी पोलीस ‘ऑपरेशन स्माइल’ राबवत असताना अशा प्रौढ व्यक्तींचा शोध घ्यायचा तरी कसा, असा प्रश्न पोलिसांसमोर उभा ठाकला आहे.
वसई-विरार शहरातील सात पोलीस ठाण्यांमध्ये २०१५मध्ये १ हजार १९४ जण बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे. त्यात ५६१ महिला, ४९६ पुरुष आणि २७ मुली आणि २८ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. सर्वाधिक म्हणजे ३२२ जण बेपत्ता असल्याच्या तक्रारी तुळींज पोलीस ठाण्यात आहेत. अल्पवयीन मुले बेपत्ता असल्यास त्यात अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात येतो. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस ठाण्यात स्वतंत्र कक्ष उभारण्यात आलेला आहे. परंतु तरीही अनेकांचा शोध लागलेला नाही. अनेक जण स्वखुशीने, घरातून भांडण झाल्यानंतर घर सोडून जात असतात. प्रेमसंबधातून अल्पवयीन मुले-मुली पळून जात असतात. मागील वर्षी हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी ‘ऑपरेशन मुस्कान’ सुरू केले होते. त्यात २८ बेपत्ता मुलांचा शोध लावण्यात यश आले होते. जानेवारी महिन्यातदेखील पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ‘ऑपरेशन स्माईल २’ सुरू केले आहे. ‘बेपत्ता मुले शोधण्याचे काम आम्ही प्राधान्याने हाती घेतले असून, त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या एका पथकाला सोबत घेतले आहे,’ असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक होनमाने यांनी सांगितले.
बेपत्ता होण्याची अनेक कारणे असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितली. एखादी व्यक्ती बेपत्ता झाल्यावर तक्रार दिली जाते. परंतु ती घरी परतल्यावर पोलिसांना कळविले जात नाही. त्यामुळे त्यांची संख्या कागदोपत्री मोठी वाटते. अल्पवयीन तरुण मुली प्रेमसंबंधातून पळून जातात. त्याचे प्रमाणही जास्त आहे.
शोधासाठी विशेष पथके
नालासोपारा येथे तीन कुटुंबातील १५ जण बेपत्ता आहेत. यापैकी रामचंद्र इगवे यांच्या कुटुंबातील ७ जण ९ महिन्यांपासून बेपत्ता आहेत. गावराई पाडा येथील इद्रिस कुटुंबातील महिला व दोन मुले बेपत्ता झाली. तर अलकापुरी येथील चौबे कुटुंबातील सहा जण बेपत्ता आहेत. त्यांच्या शोधासाठी विशेष पथके स्थापन केली आहेत.