केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा उपक्रमांतर्गत वीजेवरील बसगाड्यांच्या खरेदीसाठी उपलब्ध झालेल्या ५८ कोटींच्या निधीतून जीसीसी तत्वावर १२३ बसगाड्या प्रवाशी सुविधेसाठी घेण्याचा निर्णय ठाणे परिवहन प्रशासनाने घेतला आहे. या संबंधीच्या प्रस्तावास परिवहन समितीने सोमवारी मान्यता दिली आहे. डिसेंबरअखेरपर्यंत पहिल्या टप्प्यात ४० वीजेवरील बसगाड्या दाखल होणार असून उर्वरित बसगाड्या पुढील वर्षात मार्च महिन्यानंतर उपलब्ध होणार असल्याचा दावा परिवहन प्रशासनाने केला आहे. बस संचलनापोटी संबंधित ठेकेदाराला प्रति बससाठी प्रति किमी मागे ४९ ते १६१ रुपये इतके पैसे दिले जाणार असून हे दर इतर पालिकांच्या तुलनेत कमी असल्याचा दावाही परिवहन प्रशासनाने केला आहे.
ठाणे महापालिका परिवहन उपक्रम हा ना नफा ना तोटा या तत्वावर चालविण्यात येतो. या उपक्रमाच्या ताफ्यात एकूण ३६४ बसगाड्या आहेत. त्यापैकी उपक्रमाच्या स्वत:च्या १२४ बसगाड्या आहेत. तर, उर्वरित २२० बसगाड्या ठेकेदारामार्फत जीजीसी तत्वावरील चालविण्यात येत आहेत. एकूण ३६४ पैकी ३०० बसगाड्या प्रत्यक्षात प्रवासी सुुविधेसाठी चालविण्यात येत आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात आणि त्याबाहेरील मार्गांवर या बसगाड्या चालविण्यात येतात. शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या घरात गेली असून प्रवाशी संख्येच्या तुलनेत या बसगाड्यांची संख्या अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने परिवहनच्या ताफ्यातील बसगाड्यांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. त्याचाच एक भाग म्हणून मध्यंतरी परिवहन उपक्रमाला १५३ भंगार बसगाड्यांच्या विक्रीतून प्राप्त झालेल्या ५ कोटी ८२ लाखांच्या निधीतून २५ सीएनजीवरील बसगाड्या खरेदी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता.
त्याचबरोबर केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा उपक्रमांतर्गत ठाणे परिवहन उपक्रमाला वीजेवरील बसगाड्यांच्या खरेदीसाठी ५८ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. शासनाच्या धोरणानुसार हा निधी ठेकेदाराला देऊन त्याच्यामार्फत जीजीसी तत्वावर १२३ बसगाड्या प्रवाशी सुविधेसाठी घेण्याचा प्रस्ताव परिवहन प्रशासनाने तयार केला होता. त्यास सोमवारी झालेल्या परिवहन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे १२३ नवीन बसगाड्या परिवहन सेवेच्या ताफ्यात दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
इतर पालिकांच्या तुलनेत दर कमी
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा उपक्रमांतर्गत वीजेवरील बसगाड्यांच्या खरेदीसाठी उपलब्ध झालेल्या ५८ कोटींचा निधी ठेकेदाराला देऊन त्याच्यामार्फत जीजीसी तत्वावर १२३ बसगाड्या प्रवाशी सुविधेसाठी घेण्याचा निर्णय परिवहन प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार संबंधित ठेकेदाराला चार्जींंग स्थानक उभारणी, बसगाड्यांची देखभाल व दुरुस्ती हा खर्च करावा लागणार असून त्याचबरोबर संबंधित ठेकेदाराला प्रति बस संचलनासाठी प्रति किमी मागे पैसे दिले जाणार आहेत. हे दर इतर पालिकांच्या तुलनेत कमी असावेत, असा समिती सदस्यांचा आग्रह होता. त्यानुसार परिवहन प्रशासनाने इतर पालिकांकडून दरपत्रक मागविले होते. त्यात सर्वात कमी दर असलेल्या ठेकेदारास मान्यता देण्यात आल्याचा दावा परिवहन समिती सदस्यांनी केला आहे.
हेही वाचा : मातृत्वाचा सन्मान हाच आमचा अभिमान ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
एकूण १२३ पैकी ५५ बसगाड्या १२ मीटरच्या तर, ६८ बसगाड्या ९ मीटरच्या घेण्यात येणार आहेत. ५५ पैकी ४५ वातानुकूलीत बसगाड्यांच्या संचलनासाठी ठेकेदाराला प्रति किमीमागे १६१.९२ रुपये तर, १० साध्या बसगाड्यांच्या संचलनासाठी प्रतिकिमीमागे ६०. ९३ रुपये दिले जाणार आहेत. ६८ पैकी २६ वातानुकूलीत बसगाड्यांच्या संचलनासाठी प्रति किमी मागे ५१.४८ रुपये तर, ४२ सर्वसाधारण बसगाड्यांच्या संचलनासाठी प्रतिकिमी मागे ४९.९५ रुपये दिले जाणार आहेत.
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा उपक्रमांतर्गत जीसीसी तत्वावर वीजेवरील १२३ बसगाड्या खरेदी करण्याचे धोरण ठरवून देण्यात आले होते. त्यानुसार तयार केलेल्या प्रस्तावास परिवहन समितीने मान्यता दिली आहे. -भालचंद्र बेहेरे ,व्यवस्थापक, ठाणे परिवहन उपक्रम