– गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांची माहिती
डोंबिवली – डोंबिवलीत देसलेपाडा येथील एका घरातून कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने घातक शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. या शस्त्रांचा साठा करणारा इसम हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर उल्हासनगरमधील पोलीस ठाण्यात १२ आणि टिटवाळा पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे, अशी माहिती कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांनी दिली.
रोशन हिरानंद झा (३३) असे अटक करण्यात आलेल्या सराईत शस्त्रास्त्र तस्कराचे नाव आहे. तो डोंबिवली पूर्वेतील २७ गावातील देसलेपाडा येथील न्यू गार्डियन शाळेजवळील गोकुळधाम टाॅवरमध्ये राहत होता. देसलेपाडा भागात एका सोसायटीत एक इसम घातक शस्त्रास्त्र विक्री करण्यासाठी घेऊन आला आहे. ती शस्त्रे त्याने घरात लपून ठेवली आहे. तो ही शस्त्रे लवकर विक्री करून तेथून पळून जाणार आहे, अशी गुप्त माहिती कल्याण गुन्हे शाखेचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले यांना गुरूवारी मिळाली होती. या गुप्त माहितीची खात्री पटल्यावर भोसले यांनी ही माहिती तात्काळ आपले वरिष्ठ अजित शिंदे यांना दिली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करून रोशन झा राहत असलेल्या सदनिकेवर छापा टाकण्याचे नियोजन करण्यात आले. ठरल्या वेळेत गुन्हे शाखेच्या पथकाने झा राहत असलेल्या सदनिकेवर छापा टाकला. पोलिसांचा पाहताच तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. पण त्याला ती संधी न देता सदनिकेत त्याला पकडण्यात आले. त्याच्या घराच्या झडतीतमध्ये बिछान्याखाली, स्नानगृह, स्वच्छतागृहात लपून ठेवण्यात आलेली तलवार, सुरा, खंजिर, पिस्तुले, जिवंत काडतुसे, चाकू असा शस्त्र साठा पथकाने जप्त केला.
झा विरूध्द मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही शस्त्रे झा याने कोठून आणली. ती शस्त्रे तो कोणाला विक्री करणार होता. या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. झा विरूध्द सन २०१४ पासून चोऱ्या, लुटमार, दमदाटी, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे, शस्त्राचा धाक दाखविणे अशा कलमाने एकूण १२ गुन्हे दाखल आहेत. टिटवाळा पोलीस ठाण्यातही त्याच्या एक गुन्हा दाखल आहे. पालिका निवडणुकीपूर्वी ही शस्त्रे शहरात आणल्याने विविध तर्कवितर्क लढविले जात होते.
या कारवाईत साहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, बळवंत भराडे, उपनिरीक्षक विनोद पाटील, किरण भिसे, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बालाजी शिंदे, हवालदार गुरूनाथ जरग, सुधीर कदम, प्रशांत वानखेडे, विजय जिरे, सचिन भालेराव, गोरक्षनाथ पोटे, विलास कडू, आदिक जाधव, प्रवीण किनरे, दीपक महाजन, सतिश सोनवणे, गणेश हरणे, गोरक्ष रोकडे, जालिंदर साळुंखे, भांगरे, खंदारे सहभागी झाले होते.
