ठाण्यात महिनाभरात १४१ कोटींचा मालमत्ता कर वसुल ; आतापर्यंत मालमत्ता करापोटी २५३ कोटी रुपयांची वसुली

महापालिका करांची अपेक्षित वसुली होत नसल्यामुळे ठेकेदारांच्या देयकांचे दायित्व दिवसेंदिवस वाढू लागल्याने पालिकेची आर्थिक स्थिती बिकट झाल्याचे चित्र गेल्या महिन्यात समोर आले होते.

property tax
संग्रहित छायाचित्र

ठाणे : महापालिका करांची अपेक्षित वसुली होत नसल्यामुळे ठेकेदारांच्या देयकांचे दायित्व दिवसेंदिवस वाढू लागल्याने पालिकेची आर्थिक स्थिती बिकट झाल्याचे चित्र गेल्या महिन्यात समोर आले होते. आता हे चित्र बदलू लागल्याचे दिसून येत असून मालमत्ता करापोटी पालिकेच्या तिजोरीत आतापर्यंत २५३ कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे. त्यापैकी गेल्या महिनाभरात १४१ कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे. तसेच गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा २२ कोटी रुपयांची जास्त वसुली झाली आहे.

ठाणे महापालिकेला विविध करांंच्या माध्यमातून उत्पन्न मिळते. त्यापैकी मालमत्ता कर हा पालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत मानला जातो. करोना काळात पालिकेला मालमत्ता कर वगळता इतर करांची अपेक्षित वसुली होत नव्हती. या काळात पालिकेला मालमत्ता कराच्या वसुलीने तारल्याचे चित्र होते. गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पात मालमत्ता कर वसुलीसाठी ६९३ कोटी २४ लाख रुपयांचे उद्दीष्ट देण्यात आले होते. त्यानंतर हे उद्दीष्ट कमी करून ते ६५० कोटी रुपये इतके करण्यात आले होते. परंतु आर्थिक वर्षाअखेर पालिकेला ५९२ कोटी रुपयांची वसुली करणे शक्य झाले होते. त्यामु‌ळे पालिकेला ठरवून दिलेले उद्दीष्ट पार करता आले नव्हते. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने यंदाच्या एप्रिल महिन्यात मालमत्ता कराची देयके तयार करून कर वसुलीचे काम सुरु केले होते.

यंदाच्या अर्थसंकल्पात मालमत्ता करापोटी ७१३ कोटी ७७ लाख रुपयांचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. ते पार करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी पालिकेने कर सवलत योजना लागू केली आहे. मे महिनाअखेरपर्यंत मालमत्ता करापोटी ११२ कोटी रुपयांची रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा झाली होती. परंतु गेल्या महिनाभरात पालिकेच्या तिजोरीत १४१ कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे. त्यामुळे पालिकेकडे मालमत्ता करापोटी आतापर्यंत २५३ कोटी ९ लाखांची रक्कम जमा झाली आहे. याच कालावधीत गेल्यावर्षीच्या पालिकेच्या तिजोरीत २३० कोटी ४४ लाख रुपयांची रक्कम जमा झाली होती. त्या तुलनेत यंदा २२ कोटी ६५ लाख रुपयांची जास्त कर वसुली झाली आहे.

प्रभाग समितीनिहाय कर वसुली
प्रभाग समिती कर वसुली रक्कम (३० जूनपर्यंत)
उथळसर २०.७८ कोटी
नौपाडा-कोपरी ४०.२५ कोटी
कळवा ८.६२ कोटी
मुंब्रा ८.९५ कोटी
दिवा ७.८३ कोटी
वागळे इस्टेट ८.३३ कोटी
लोकमान्य-सावरकर ९.२६ कोटी
वर्तकनगर ४७.४० कोटी
माजीवाडा-मानपाडा ८७.५४ कोटी
इतर १४.१३ कोटी
एकूण २५३.०९ कोटी

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 141 crore property tax collected in thane in a monthrs 253 crore has been recovered from property taxes amy

Next Story
नवे सरकार स्थापन झाल्यामुळे ठाण्यात भाजपचा जल्लोष ; फडणवीसांचे मुख्यमंत्री पद हुकल्याची कार्यकर्त्यांमध्ये खंत
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी