ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. रविवारी तब्बल २१ जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आल्यामुळे शहरातील एकूण रुग्णसंख्या ९७३ वर पोहचली आहे. आतापर्यंत शहरात १६ जणांनी करोनाशी लढताना आपले प्राण गमावले असून वाढत जाणारी रुग्णसंख्या पाहता स्थानिक प्रशासनाने पुन्हा एकदा लॉकडाउन जाहीर केलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने १७६७ लोकांना होम क्वारंटाइन केलं आहे.

रविवारी पॉजिटीव्ह अहवाल आलेल्या २१ रुग्णांपैकी ५ रुग्ण हे बाधित व्यक्तीच्या संपर्कात आले होते. ८ व्यक्ती या अत्यावश्यक सेवेत काम करण्यासाठी घराबाहेर पडत असताना त्यांना लागण झाल्याचं कळतंय, तर उर्वरित ८ व्यक्तींना या विषाणूची लागण कशी झाली याचं कारण समजू शकलेलं नाही. आतापर्यंत ४६९ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत. अद्याप ९० जणांचा अहवाल येणं बाकी असल्यामुळे येत्या दिवसात रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. शहरातील रुग्णांवर पालिकेच्या रुग्णालयासह उल्हासनगर, डोंबिवली, ठाणे आणि मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.