|| भगवान मंडलिक लग्न, व्रतबंध आणि वास्तूपूजनासाठीची लगबग डोंबिवली : नवीन वर्ष सुरू झाले की अनेक कुटुंबांत विविध मंगल कार्यांचे नियोजन सुरू होते. काहींना लग्न, वास्तुशांती, व्रतबंध (मुंज) अशा अनेक कार्यांसाठी लगबग सुरू होते. त्यासाठी प्रथम पाहिला जातो तो मुहूर्त. या मंगल कार्यासाठी या वेळी पंचांगशास्त्रींनी जानेवारी ते डिसेंबर २०२२ कालावधीत एकूण २१३ मुहूर्त काढले आहेत. परदेशात शिक्षणासाठी, नोकरी, व्यवसायासाठी गेलेल्या मुलांची लग्ने कुटुंबीयांनी दूरदृश्य प्रणाली माध्यमातून जमवून ठेवलेली असतात. परदेशातील कामाच्या वेळा, सुट्टी यांचा विचार करून कुटुंबीय पुरोहितांकडून परदेशात वास्तव्यास असलेल्या मुलांच्या सुट्टीचा विचार करून मुहूर्त काढतात. अनेक कुटुंबीयांना व्रतबंध (मुंज) संस्कार करायचा असतो. बहुतांश कुटुंबे मुलांच्या शाळा, परीक्षा यांचा मेळ पाहून मुलांचा व्रतबंध संस्कार करून घेतात. या सोहळ्यांसाठी सभागृहात सहा महिने अगोदर नोंदणी करावी लागते. नवीन घर खरेदी केल्यानंतर वास्तुपूजन केल्याशिवाय अनेकांना समाधान मिळत नाही. त्यामुळे वास्तुपूजनाचेही खास असे मुहूर्त शोधले जातात. आप्त, नातेवाईक, मित्र यांची उपस्थिती राहणार असल्याने प्रत्येकाच्या वेळा, सोयी पाहून नातेवाईक हे सोहळे आयोजित करतात. त्यामुळे बहुतांशी रहिवासी नवीन वर्ष सुरू झाले की तातडीने त्यामध्ये मुहूर्त कधी आणि किती आहेत याची चाचपणी सुरू करतात, असे पुरोहितांनी सांगितले. सर्वाधिक मुहूर्त लग्नासाठी चालू वर्षात विवाह सोहळ्याचे एकूण १२२ मुहूर्त आहेत. विवाहाचे सर्वाधिक मुहूर्त फेब्रुवारी, मार्च, मे, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांत आहेत. व्रतबंध (मुंज) सोहळ्यासाठी वर्षभरात ४४ मुहूर्त आहेत. या सोहळ्यासाठी सर्वाधिक मुहूर्त फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, एप्रिल, मे, ऑगस्टमध्ये आहेत. वास्तुशांतीचे एकूण ४७ मुहूर्त वर्षभरात आहेत. जानेवारी, फेब्रुवारी, मे, जून, नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्यांत सर्वाधिक मुहूर्त आहेत. एप्रिल, जुलै, सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यांत वास्तुशांतीचा एकही मुहूर्त नाही, असे पंचांगशास्त्रींनी सांगितले..