ठाणे जिल्ह्य़ात गेल्या दोन दिवसात २६ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले असून यामुळे जिल्ह्य़ातील करोनाबाधितांची संख्या ६६ इतकी झाली आहे. त्यात सर्वाधिक म्हणजे २२ रुग्ण हे नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील असून त्या खालोखाल कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात २० तर ठाणे महापालिका क्षेत्रात १४ रुग्ण आहेत. त्यामुळे या तिन्ही क्षेत्रात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र आहे. तसेच कळवा परिसरात गुरूवारी आढळून आलेल्या एका करोनाबाधित रुग्णाने परिसरातील एका खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार घेतल्याची माहिती पुढे आली असून त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे महापालिकेने रुग्णालय बंद करून तिथेच दोन डॉक्टर आणि सहा कर्मचाऱ्यांना देखरेखीखाली ठेवले आहे.

ठाणे जिल्ह्य़ातील शहरी तसेच ग्रामीण भागांमध्ये करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून बुधवापर्यंत संपुर्ण जिल्ह्य़ात करोनाबाधीत रुग्णांची संख्या ४० इतकी होती. मात्र, गुरूवारी दिवसभरात २४ नवीन रुग्ण आढळून आल्याने रुग्णांचा आकडा ६४ वर पोहचला. यामुळे जिल्ह्य़ात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असतानाच, शुक्रवारी दिवसभरात ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे जिल्ह्य़ातील रुग्णांचा आकडा आता ६६ इतका झाला आहे. त्यामध्ये ठाणे महापालिका क्षेत्रातील १४, कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २०, नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील २२, उल्हानगर महापालिका क्षेत्रातील १, मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील ६ आणि ठाणे ग्रामीण परिसरातील ३ रुग्णांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, भिवंडी महापालिका क्षेत्रासह अंबरनाथ आणि कुळगाव-बदलापूर क्षेत्रामध्ये एकही करोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे हे तिन्ही परिसर अद्याप तरी सुरक्षित असल्याचे चित्र आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये बुधवापर्यंत करोनाबाधितांची संख्या ११ इतकी होती. मात्र, याठिकाणी गुरुवारी दिवसभरात ११ नवीन रुग्ण आढळून आल्याने तेथील रुग्णांचा आकडा २२ इतका झाला. शुक्रवारी मात्र याठिकाणी नवीन रुग्ण आढळून आलेला नाही. तसेच गुरुवारी दिवसभरात २३८ जणांमध्ये करोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांना मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. शुक्रवारची आकडेवारी सायंकाळी उशीरापर्यंत मिळू शकली नव्हती.

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील म्हात्रेनगरमधील शेलार कुटूंबियांच्या हळदी कार्यक्रमात सहभागी झालेल्या ४० वऱ्हाडींचा शोध घेऊन महापालिकेच्या पथकाने या सर्वाना शास्त्रीनगर रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवले आहे. या सर्वाची आरोग्य पथकाकडून तपासणी करण्यात येत असून त्यामध्ये त्यांच्यात करोनाची लक्षणे दिसून येतात का, याची पाहाणी केली जात आहे.