ठाणे : भिवंडी येथील चिंबीपाडा आश्रमशाळेतील तीस जणांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. करोनाची लागण झालेल्यांमध्ये २३ मुली, ५ मुले आणि दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.  लागण झालेल्या सर्व विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.  चिंबीपाडा येथे पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची आश्रमशाळा आहे. या आश्रमशाळेत शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांना सोमवारी ताप आणि सर्दीचा त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे १९८ विद्यार्थ्यांची चिंबीपाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करोना चाचणी करण्यात आली. चाचणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी २८ मुलांचे तर दोन कर्मचाऱ्यांचे करोना अहवाल सकारात्मक आले आहेत. या २८ विद्यार्थ्यांमध्ये २३ मुलीं तर ५ मुलांचा समावेश आहे. करोना अहवाल सकारात्मक आलेल्या २८ विद्यार्थ्यांना आणि दोन कर्मचाऱ्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.