अंबरनाथमधील शिवसेना नगरसेवक रमेश गुंजाळ यांच्या हत्येप्रकरणी १३ संशयितांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चार आरोपींना पोलिसांनी अटक केली. सचिन चव्हाण, दीपक कळिंबे, संदीप गायकर आणि विशाल जव्हेरी अटकेतील आरोपींची नावे आहेत. रविवारी रात्री टिटवाळा पोलिसांनी चौघांना खडवली भागातून ताब्यात घेतल; मात्र चौघांना पोलिसांनी अटक केली की त्यांनी पोलिसांपुढे शरणागती पत्करली, याबाबत स्पष्ट होऊ शकलेले नाही.
अटकेतील तरुण मोरीवली गावातील रहीवाशी असून त्यांनी पूर्व वैमनस्यातून ही हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे.
अंबरनाथ पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक रमेश गुंजाळ यांच्यावर २५ डिसेंबरला मोरीवली गावाजवळ धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यांत त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. जखमी अवस्थेतील गुंजाळ यांनी उपचारादरम्यान मित्रांना हल्लेखोरांची नावे सांगितली होती. त्यामुळे मोरीवली गावातील ११ आणि गावाबाहेरील दोन अशा १३ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता.
हत्येच्या तपासासाठी अंबरनाथ पोलिसांनी दहा पथके विविध ठिकाणी पाठवली होती. रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास या चारही आरोपींना टिटवाळा पोलीसांनी ताब्यात घेऊन नंतर त्यांना अंबरनाथ पोलिसांच्या ताब्यात दिले. या आरोपींना कडक बंदोबस्तात उल्हासनगर सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 29th Dec 2015 रोजी प्रकाशित
शिवसेना नगरसेवक हत्येप्रकरणी चौघे अटकेत
अंबरनाथमधील शिवसेना नगरसेवक रमेश गुंजाळ यांच्या हत्येप्रकरणी १३ संशयितांवर गुन्हा दाखल झाला आहे
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 29-12-2015 at 00:03 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 4 arrested in shiv sena corporator ramesh gunjal murder