ठाणे – ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी करोनाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. जिल्ह्यात शुक्रवारी ४४७ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी नवी मुंबई महापालिका क्षेत्रात १९४ सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. या खालोखाल ठाणे महापालिका क्षेत्रात १६२ बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर रुग्णसंख्येत ही वाढ झाल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर पडली आहे.

ठाणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून करोनाच्या रुग्णसंख्येत हळूहळू वाढ होताना दिसून येत आहे. जिल्ह्यात मागील आठवड्याभराच्या कालावधीत दररोज १८० ते २५० रुग्ण आढळून येत आहे. तर शुक्रवारी करोनाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली असून एका दिवसात ४४७ रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांपैकी नवी मुंबई १९४, ठाणे १६२, कल्याण – डोंबिवली ४३, मिरा भाईंदर २४, ठाणे ग्रामीण १४, उल्हासनगर सात आणि भिवंडी पालिका क्षेत्रात तीन रुग्ण आढळून आले आहेत. सणोत्सवाच्या कालावधीत जिल्ह्यातील करोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत आरोग्य विभागाकडून नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी वावरताना खबरदारी घेण्याचे तसेच मुखपट्टी वावरण्याचे आवाहन केले आहे.