मेअखेपर्यंत चिंता मिटली; पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालघर जिल्ह्य़ात ठिकठिकाणी पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असताना वसई-विरार महापालिका हद्दीतील पाणीपुरवठा करणारी तीनही धरणांत पाण्याचा साठा समाधानकारक आहे. तीन धरणांचा साठा मिळून ४६.२५ टक्के इतका असल्याने मेअखेरीपर्यंत नागरिकांची पाण्याची चिंता मिटलेली असेल, असे पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

वसई, नालासोपारा, विरार, नायगाव ही चार शहरे आणि ग्रामीण भाग वसई विरार महापालिका हद्दीत येतात. वाढते नागरिकीकरण आणि त्या गरजेनुसार पाण्याचे नियोजन करता यावे या प्रयोगात पालिका यशस्वी झाल्याने यंदा धरणात असलेला मुबलक साठा असल्याचे सांगण्यात आले. वसई विरार शहराला सूर्यातून १०० एमएलडी, सूर्या टप्पा-३  मधून ५० एमएलडी तर उसगाव मधून २० एमएलडी आणि पेल्हारमधून १० एमएलडी पाणी प्रतिदिन मिळत आहे. गेल्यावर्षी पाण्याची टंचाई भासली होती. परंतु यंदा पाण्याचे नियोजन व्यवस्थित झाल्याने धरणात पाण्याचा साठा समाधानकारक आहे. याउलट स्थिती पालघर जिल्ह्य़ात आहे. जिल्ह्य़ातील अनेक गावांना टंचाईचा सामना करावा लागत आहे.

सूर्या धरणातील सध्याचा पाण्याचा साठा १७८६ घन मिलिमीटर असून ६४ टक्के पाणी शिल्लक आहे. पेल्हार धरणात ११७८ घन मिलिमीटर म्हणजेच ३९ टक्के इतका पाण्याचा साठा आहे. सूर्या धरणात १७७,०२१ घन मिमी पाणी म्हणजेच ६४.०४ टक्के पाणी साठा सध्या शिल्लक आहे. त्यामुळे हा पाणीपुरवठा ४० दिवस नियोजनपद्धतीने वसईतील नागरिकांना केला जाणार आहे.  रोज १८० एमएलडी पाणी नागरिकांना मिळणार आहे. असे पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता सुरेंद्र ठाकरे यांनी सांगितले.

पाणी पुरवठा करणारी धरणात समाधानकारक पाण्याचा साठा आहे. त्यामुळे रोज १८० एमएलडी पाणी वसई पालिका हद्दीतील नागरिकांना मिळेल. मे अखेरीपर्यंत हा साठा राहील.

-सुरेंद्र ठाकरे, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग  , वसई स्थानिक  :

वसई विरार शहर महानगरपालिका भागाला पालघर येथील सूर्या धरणातून मोठय़ा प्रमाणावर पाणीपुरवठा करण्यात येतो. या पाणीपुरवठय़ासाठी टाकलेली जलवाहिनी लिकेज झाल्यानंतर मोठय़ा प्रमाणावर पाणी वाया जाते. त्यामुळे पाण्याची नासाडी ही होतेच परंतु त्या व्यतिरिक्त दुसरीकडे पाणी चोरी, सार्वजनिक स्टॅन्ड पोस्टवरील पाण्याचा अपव्यय, तेथील नळ, पाईप हे नेहमीच गळत असतात. या प्रकाराने दररोज लाखो लिटर पाणी वाया जाते. त्यामुळे जरी पाण्याचा साठा समाधानकारक असला तरी तो नागरिकांपर्यंत नीट पोहोचतोय की नाही याची दखल पालिकेने घेणे गरजेचे आहे. जर या समस्या दूर केल्या तर उन्हाळ्यात होणारी पाणीटंचाई कमी होईल.

-साक्षी मेहता, नागरिक वसई

दोन योजना राबविल्याने यश..पण पालघरचे हाल

* वसई विरार महापालिकेने सूर्याच्या दोन योजना राबविल्या आणि त्यातच पेल्हार आणि उसगाव धरणाचा आधार मिळाला आहे. त्यामुळे यातील पावसाळ्यात केलेला पाण्याचा साठा व्यवस्थित असल्याने उन्हाळ्यात नागरिकांना पाणी टंचाई जाणवणार नाही.

*  पाणी रोज मिळणार असले तरी मात्र पाण्याचा वापर योग्यरित्या करावा. पाणी वाया घालवू नये,पिण्याचे पाण्याचा वापर अन्य वापरासाठी करण्यात येवू नये असे आवाहन वसई विरार शहर महापालिकेने नागरिकांना केले आहे.

*  वसई विरार शहर महापालिका भागात अजूनही अनेक भागात पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.

कामण येथील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 46 percent water stock in dam under vasai virar region
First published on: 10-04-2018 at 02:11 IST