मध्य रेल्वेवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्य रेल्वेच्या सर्वात गर्दीच्या व व्यस्त अशा कल्याण स्थानकात १४९ पैकी ६१ सीसीटीव्ही कॅमेरे अस्पष्ट असल्याचे लोहमार्ग पोलिसांच्या सुरक्षा तपासणी अहवालातून समोर आले आहे. त्यापाठोपाठ वाशी स्थानकातही हीच परिस्थिती आहे. अस्पष्ट सीसीटीव्ही असतानाही ते स्थानकात बसवण्यापूर्वी रेल्वेकडून सुरक्षेचा योग्य विचार का करण्यात आला नाही, असा प्रश्न यातून उपस्थित होतो.

रेल्वे स्थानक व हद्दीत घडणाऱ्या गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मोठी मदत मिळते. परंतु काहीवेळेला सीसीटीव्हीची असणारी अस्पष्टता यामुळे आरोपीचा शोध घेण्यास तेवढीच अडचणही होते. सीसीटीव्हीची अस्पष्टता हा कळीचा मुद्दा असूनही रेल्वे प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्षच होत आहे.

रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढते आहे. महिला डब्यात कोणीही नसल्याचे पाहून नुकतेच एका पुरुष प्रवाशाने डब्यात शिरकाव केला. १३ वर्षीय विद्यार्थिनीने त्याला विरोध करताच तिला दमदाटी करण्यात आली. भीतिपोटी या विद्यार्थिनीने आपला जीव वाचवण्यासाठी लोकलमधून उडी घेतली. सीएसएमटी स्थानकाजवळच घडलेल्या या घटनेचा लोहमार्ग पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे यशस्वी तपास केला व आरोपीला अटक केली. अशा बोटावर मोजण्याइतक्या गुन्ह्यांचा तपास सीसीटीव्हीच्या आधारे करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या सुरक्षा तपासणीत अतिरिक्त सीसीटीव्हीच्या गरजेबरोबरच सध्याच्या सीसीटीव्हीचा दर्जा आणि त्यांची असलेली दिशा या बाबी निदर्शनास आणून दिल्या आहेत. यात कल्याण स्थानकात एकूण १४९ पैकी ६१ सीसीटीव्हीची स्पष्टता योग्य नसून ६३ सीसीटीव्हीची दिशा ही सीएसएमटीकडे असायला हवी, असे अहवालात नमूद केले आहे. विशेष म्हणजे, कल्याण स्थानकातील गुन्हेगारीच्या घटनांचे प्रमाण २०१६च्या तुलनेत जवळपास चौपट झाले आहे.

कॅमेरे बदलणार

लोहमार्ग पोलिसांच्या अहवालाची दखल घेण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे सुरक्षा दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. आम्ही आता ४००पेक्षा अधिक सीसीटीव्ही बसवणार असून यासंदर्भात प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हे कॅमेरे हाती आल्यानंतर कल्याण व वाशी स्थानकांतील सीसीटीव्ही कॅमेरे बदलण्यात येतील, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

‘अस्पष्ट’ कॅमेऱ्यांचा फटका

* साधारण तीन वर्षांपूर्वी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून गायब झालेल्या ईस्थर अनुया या तरुणीचे प्रकरण बरेच गाजले होते. बलात्कार करून खून झालेल्या या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजची मदत जरी झाली असली, तरी त्याची असलेली अस्पष्टता यावरून बरीच चर्चादेखील झाली.

* २०१३मध्ये वांद्रे टर्मिनसवर प्रीती राठी या तरुणीवर झालेल्या अ‍ॅसिड हल्लाप्रकरणीही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या अस्पष्टतेचा मुद्दा ऐरणीवर आला होता.

कल्याण स्थानकातील गुन्हे व तपास

वर्ष     गुन्हे    यशस्वी तपास

२०१६   २८९      १५९

२०१७   ११०४     २८५

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 61 cctv camera quality low fix at kalyan railway station
First published on: 03-11-2017 at 01:09 IST