ठाण्याचे नवे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेताना सोनसाखळी चोरांच्या मुसक्या आवळण्याची तसेच महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याची घोषणा केली होती. मात्र मंगळवारी शहरात आठ सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्याने ही घोषणा आता हवेत विरल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, मंगळवारी घडलेल्या सोनसाखळी चोरीच्या आठपैकी पाच नौपाडा भागात घडल्या.
परमवीर सिंग यांनी ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सोनसाखळी चोरांवरील कारवाईस वेग आला होता. यासाठी पोलिसांचे विशेष पथकही तयार करण्यात आले होते. यानंतर काही काळ सोनसाखळी चोरीचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून चोरटय़ांचा उपद्रव पुन्हा सुरू झाला आहे. मंगळवारी शहरात आठ सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या असून त्यामध्ये नौपाडय़ात पाच घटनांचा समावेश आहे.
कोलबाड परिसरातील आदर्शनगरमध्ये राहणारे कलावती एस. ड्रायव्हर (७०) यांच्या गळ्यातील ७५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र मोटारसायकलवरून आलेल्या चोरटय़ांनी खेचले, तर रायगड येथे राहणाऱ्या वंदना वसंत थोरवे (६५) या खोपट एसटी स्थानकाजवळून जात असताना चोरटय़ांनी त्यांच्या गळ्यातील ६० हजार आणि ३० हजार रुपये किमतीची दोन मंगळसूत्रे खेचून पळ काढला. भास्कर कॉलनी भागात राहणाऱ्या अपर्णा विश्वनाथ पाटणकर (६३) यांचे मंगळसूत्र आणि सोनसाखळ्या असा दोन लाख ३१ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरांनी खेचून नेला. खोपट भागातील प्रताप सिनेमागृहाजवळ राहणाऱ्या पेस्टी बाबू चाको (४२) यांचे मंगळवारी चरई भागात ८० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरटय़ाने लांबवले. गोखले रोड येथे राहणाऱ्या सुरेखा प्रमोद आनंदकर (६४) यांची आइस फॅक्टरी भागात सोनसाखळी चोरटय़ांनी खेचली. घोडबंदर रोड येथे राहणाऱ्या स्नेहलता हरिश्चंद्र पाटील (५३), मानपाडा भागात राहणाऱ्या रोहिणी रोहिदास गोळे (४३), लोकमान्यनगर येथे राहणाऱ्या सरोज सतीश सावंत (४२) यांच्या गळय़ातील दागिनेही चोरटय़ांनी लांबवले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 8 chain snatching incidents in a day
First published on: 25-04-2015 at 12:10 IST