डोंबिवली शिवसेना मध्यवर्ति शाखेचा ताबा घेणे आणि शाखेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या तसबिरी लावण्यावरुन मंगळवारी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे समर्थक आणि माजी नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांचे शिंदे समर्थक कार्यकर्ते एकमेकांना भिडले. दोन्ही गटात राडा होऊन शिंदे समर्थकांनी ठाकरे समर्थकांना मारहाण केली. यावेळच्या शाब्दिक बाचाबाचीत ठाकरे समर्थक महिला पदाधिकारी कविता गावंड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी अपशब्द वापरले असा आरोप शिंदे समर्थकांनी केला. शिंदे समर्थकाच्या तक्रारीवरुन गावंड यांच्या विरुध्द रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

योगेश जुईकर यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. कविता गावंड या शिवसेनेचे माजी शहरप्रमुख दिवंगत गोविंद चौधरी यांच्या कन्या आणि विधानसभा महिला संघटक आहेत.

शिंदे समर्थक रमेश म्हात्रे यांचे सुमारे २०० हून अधिक कार्यकर्ते एकावेळी शिवसेना शाखेत घुसले. त्यांनी ठाकरे समर्थक पदाधिकाऱ्यांना शाखे बाहेर जाण्यास सांगून मुख्यमंत्री, खासदार शिंदे यांच्या तसबिरी लावण्यास सुरुवात केली. यावेळी ठाकरे समर्थक शहरप्रमुख विवेक खामकर, कविता गावंड, अरविंद बिरमोळे यांनी त्यास हरकत घेतली. त्याचा राग आल्याने शिंदे समर्थक शिवसैनिकांनी ठाकरे समर्थकांना मारहाण करत शाखे बाहेर फरपटत काढले. खामकर यांना मारहाण, महिलांवर हात उचलण्यात आले, असे ठाकरे समर्थकांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या गदारोळात कविता गावंड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विषयी अपशब्द वापरले, असा आरोप रमेश म्हात्रे समर्थक कार्यकर्ते योगेश जुईकर यांनी पोलीस ठाण्यात केला. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.