ठाणे : महापालिका अतिक्रमण विभागाचे साहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी मारहाण केली होती. या मारहाणप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आव्हाड यांच्याविरोधात हत्येचा प्रयत्न, लोकसेवकावर हल्ला करणे, शस्त्रास्त्र कायदा कलमे दाखल करण्यात आली आहेत.

आव्हाड यांच्या मतदारसंघातील बेकायदा बांधकामांवर कारवाई केल्याने तसेच त्यांचे ऐकले नाही म्हणून हा हल्ला करण्यात आल्याचे महेश आहेर यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणात पोलिसांनी आव्हाड यांचे खासगी स्वीय साहाय्यक अभिजीत पवार, विशंत गायकवाड, हेमंत वाणी आणि विक्रम खामकर या चौघांना नौपाडा पोलिसांनी अटक केली. गुरुवारी त्यांना ठाणे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एकदिवसीय पोलीस कोठडी सुनावली.

ठाणे महापालिका अतिक्रमण विभागाचे साहाय्यक आयुक्त महेश आहेर हे बुधवारी सायंकाळी कामकाज संपवून घरी जात होते. त्यावेळी महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर अभिजीत पवार, विशंत, हेमंत आणि विक्रम यांच्यासह काही कार्यकर्ते त्या ठिकाणी आले. जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला, जावयाला जिवे ठार मारण्याची धमकी देतो का, असे म्हणत त्यांनी महेश आहेर यांना मारहाण केली होती. या घटनेनंतर त्यांना संरक्षणात पालिकेत आणण्यात आले. तेथून त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर एका खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, त्यांनी नौपाडा पोलिसांकडे या प्रकरणाची तक्रार दाखल केली आहे.

या तक्रारीनुसार काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे पदाधिकारी विक्रम खामकर यांच्याविरोधात तक्रार दिल्याने, आव्हाड यांच्या कळवा-मुंब्रा मतदार संघातील बेकायदा बांधकाम तोडल्याने आणि आव्हाड यांचे ऐकले नाही म्हणून ही मारहाण करण्यात आल्याचे म्हटले आहे. तसेच ‘आव्हाड साहेबांनी तुला संपवायला सांगितले आहे’ असे सांगून मारहाण करण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. हल्लेखोरांचा माझ्यावर बंदूक आणि चॉपरने वार करण्याचा उद्देश होता. अंगरक्षक आले असता मारहाण करणारे पळून गेले तसेच जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर बुधवारी रात्री उशिरा नौपाडा पोलिसांच्या पथकाने अभिजीत पवार, विक्रम खामकर, विशंत गायकवाड आणि हेमंत वाणी या चौघांना ताब्यात घेऊन अटक केली. त्यांना गुरुवारी सकाळी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी न्यायालयात वकिलांमार्फत आरोपींची सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली असता न्यायाधीशांनी त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी दिली. त्यामुळे शुक्रवारी पुन्हा आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान, आव्हाड यांच्यासह इतर आरोपींचा पोलीस शोध घेत होते. आरोपींचे कॉल तपशील तसेच इतर माहिती मिळविण्यास पोलिसांनी सुरुवात केली होती.

ठाण्यातील अनधिकृत बांधकाम सम्राटांचा सहकारी म्होरक्या,  भ्रष्ट आणि गुंड अधिकारी महेश आहेर याला ठाणेकर जनतेने अक्षरश: तुडवला. एका आमदाराच्या मुलीला मारण्याची धमकी दिली जाते. ठाणे महापालिकेतील या गुंड अधिकाऱ्याची विशेष तपास पथकामार्फत चौकशी होईल का?  

– केदार दिघे, जिल्हाप्रमुख, शिवसेना, ठाकरे गट.