दत्तात्रय भरोदे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहापूर तालुक्यातील शेणवे येथील शासकीय आश्रमशाळेत १०वी मध्ये शिकत असलेल्या एका आदिवासी मुलीने गणपतीच्या सुट्टीला घरी गावाला गेल्यावर आत्महत्या करून आपले जीवन संपवले असल्याची दुर्दैवी घटना घडली. विशेष म्हणजे या घटनेबाबत कोणत्याही शासकीय यंत्रणेला संपर्क न करता मृत मुलीचे सर्व अंत्यविधी पार पाडण्यात आले. यामुळे संशय निर्माण झाला असून इतक्या गंभीर स्वरूपाची घटना घडली असताना पोलिसांसह कोणालाही माहिती नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

११ सप्टेंबरला घडलेल्या या गंभीर घटनेची दखल शहापूर तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी व शहापुरच्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ तरुलता धानके यांनी घेतली आहे. त्यांनी शेणवे आश्रमशाळेला व मुलीच्या घरी भेट दिली. तसेच याबाबत, सदर मुलीचे प्रेत उकरून शवविच्छेदन करण्याचा आदेश तहसीलदारांनी वासिंद पोलीस स्टेशनला दिले आहेत.

शहापूर एकात्मिक आदिवासी प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या शेणवे येथील कन्या आश्रमशाळेत फक्त आदिवासी समाजातील मुली शिक्षण घेतात. ठाणे व पालघर जिल्ह्यातील आदिवासी मुली या शाळेत शिक्षण घेत आहेत. गणपती सुट्टीसाठी आश्रमशाळेतील मुली या आपल्या गावाला गेल्या होत्या. गणपतीची सुट्टी संपल्यावर देखील १०वीच्या वर्गातील एक मुलगी आश्रमशाळेत आली नाही, म्हणून शाळेतील शिक्षक मुलीच्या शहापूर तालुक्यातील रास या गावात आणण्यासाठी गेले असता तिच्या कुटुंबाकडून तिने आत्महत्या केली असल्याचे सांगण्यात आले. शाळेतील शिक्षकांनी आदिवासी विकास प्रकल्पाला माहिती कळवली होती.

मृतदेह बाहेर काढण्याचे आदेश
११ सप्टेंबरला ही दुःखद घटना घडून देखील गावातील पोलीस पाटील यांनीदेखील वासिंद पोलीस ठाण्यात खबर देण्याचे टाळले होते. बुधवारी शहापुरचे तहसीलदार तथा तालुकास्तरीय समितीचे सदस्या नीलिमा सूर्यवंशी, शहापुरच्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ तरुलता धानके, आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे विस्तार अधिकारी यांनी शेणवे येथील कन्या आश्रमशाळेला भेट देत घडलेल्या घटनेची माहिती घेत थेट मुलीच्या रास गावी त्यांच्या कुटुंबीयांना भेट दिली. अचानक असे काय झाले की मुलीला आत्महत्येचा निर्णय घ्यावा लागला? परस्पर अंत्यविधी पार पडला कसा? मृतदेह रुग्णालयात का नेण्यात आला नाही? असे अनेक प्रश्न अनुत्तरित असल्याने समितीचे सदस्य व तालुका दंडाधिकारी नीलिमा सूर्यवंशी यांनी वासिंद पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना मुलीचे प्रेत जमिनीतून बाहेर काढून शवविच्छेदनाचे आदेश दिले आहेत. हा अतीगंभीर प्रकार असताना देखील काल आश्रमशाळेवर भेट देताना व मुलीच्या घरी भेट देताना आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तथा तालुका स्तरीय समितीचे अध्यक्ष अरुण जाधव हे हजर नसल्याचे समजते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A girl student claim to commit suicide buried without informing police in shahapur sgy
First published on: 20-09-2019 at 16:48 IST