ठाणे : केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आयोजित करण्यात आलेले ऑपरेशन अभ्यास हे आपत्कालीन परिस्थितीतील सज्जतेचे मॉक ड्रिल रविवारी ठाण्यातील लोढा अमारा, कोलशेत मैदान येथे यशस्वीरित्या पार पडले. शनिवारी दुपारी ४.३० वाजता सायरनच्या आवाजाने या मॉक ड्रिलला सुरुवात झाली.

ठाणे जिल्हाधिकारी तथा नागरी संरक्षण दलाचे नियंत्रक अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक विजय जाधव यांच्या नेतृत्वात ही मॉक ड्रिल राबविण्यात आली.

या मॉक ड्रिलमध्ये काल्पनिक एअर स्ट्राईक, बॉम्ब हल्ल्याच्या घटनाक्रमानुसार कृती पार पडली. हल्ल्यानंतर नागरिकांना त्वरित सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. कोणताही गोंधळ न करता नागरिकांनी शांतपणे प्रशासनाच्या सूचना पाळल्या. शोधमोहीम राबवून ४० जखमी आणि अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात आले आणि प्रथमोपचार देण्यात आले. इमारतीत अडकलेल्या पाच जणांचीही सुरक्षित सुटका करण्यात आली.

या मॉक ड्रिलमध्ये महसूल, आरोग्य, पोलीस, नागरी संरक्षण दल, होमगार्ड, ठाणे महानगरपालिका, आपत्ती व्यवस्थापन, टीडीआरएफ, अग्निशमन दल, लोढा अमारा गृहसंकुलातील यंत्रणा, सुरक्षा रक्षक व स्थानिक नागरिकांनी सहभाग घेतला.प्रांताधिकारी उर्मिला पाटील व तहसिलदार उमेश पाटील यांनी सांगितले की, हे मॉक ड्रिल केवळ आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाची तयारी तपासण्यासाठी आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी नागरिकांच्या सहकार्याबद्दल आभार मानले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या महत्त्वपूर्ण ड्रिल प्रसंगी सहाय्यक पोलीस आयुक्त मंदार जवळे, ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त दिनेश तायडे, सहायक आयुक्त सोनल काळे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी, उपायुक्त प्रणाली घोंगे, मुख्य अग्निशमन नियंत्रण अधिकारी निलेश झलके, सहाय्यक पोलीस आयुक्त ममता डिसूझा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. अनिता जवंजाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. पोळ, नायब तहसिलदार दिनेश पैठणकर आदी अधिकारी उपस्थित होते.या ऑपरेशन अभ्यास मॉक ड्रिलच्या माध्यमातून ठाणे शहरातील आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असून नागरिकांचा प्रतिसादही उत्साहवर्धक असल्याचे दिसून आले.