जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या स्वयंसहाय्यता बचत गटातील महिलांची कार्यशाळा व जिल्हास्तरीय सरस प्रदर्शनाच्या कार्यक्रमात उभारलेल्या मंडपात सोसाट्याचा वारा शिरल्याने मंडपाचा एक भाग कोसळला. यामुळे अनेक महिला किरकोळ जखमी झाल्या. कापडी मंडपामुळे यात कोणी गंभीर जखमी झाले नसले तरी मंडप कोसळल्याने महिलांमध्ये एकच गोंधळ उडाला.
हेही वाचा >>>जळगाव: सायाळची शिकार करणारे चौघे वनविभागाच्या जाळ्यात
शहापूर जवळील आसनगाव येथील मैदानावर बुधवारी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्वयंसहाय्यता गटातील महिलांची कार्यशाळा व जिल्हास्तरीय सरस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून तब्बल वीस हजार महिलानी उपस्थिती दर्शवली होती. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले केंद्रीय ग्रामविकास मंत्री गिरीराज सिंह, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनपर भाषण झाले. प्रमुख पाहुणे निघून गेल्यानंतर दुपारी तीन वाजताच्या सुमारास उपस्थित महिलांना कार्यशाळेच्या माध्यमातून व्यवसाय, विविध योजना व अनुदान याबाबत मार्गदर्शन सुरू असताना भव्य मंडपात सोसाट्याचा वारा शिरल्याने मंडपाचा एक भाग कोसळला.
हेही वाचा >>>Video: दोन वर्षांची शिक्षा झाल्यानंतर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया; पोलीस तपासावरच सवाल उपस्थित
यामध्ये अनेक महिला किरकोळ जखमी झाल्या. कापडी मंडप असला तरी लोखंडी खांब उन्मळून पडल्याने काही महिलांच्या डोक्याला, डोळ्याला दुखापत झाली. अचानक मंडप कोसळल्याने महिलांमध्ये एकच गोंधळ उडाल्याने महिलांच्या कार्यशाळेचा कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला. दरम्यान, महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या शासकीय कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेला मंडप अचानक कोसळून झालेल्या दुर्घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली जात आहे.