चलनातून बाद झालेल्या जुन्या नोटा बदलून देण्याचे अमिष दाखवून सहा भामट्यांनी उल्हासनगरातील एका व्यापाऱ्याला तब्बल ६७ लाख रूपयांचा गंडा घातला आहे. धक्कादायक म्हणजे एकीकडे नोटा बदलण्यासाठी दलाली मिळवत असतानाच दुसरीकडे हाच व्यवहार बनावट पोलिसांच्या मदतीने रंगेहात पकडवून पुन्हा संबंधित व्यक्तीकडून पैसे उकळल्याचे समोर आले आहे. तब्बल पाच कोटी रूपयांच्या जुन्या नोटा बदलण्याचे अमिष दाखवण्यात आले होते. त्यामुळे या प्रकारात तक्रारदारही अडचणीत येण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारने २०१६ मध्ये चलनातील ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा बाद केल्या. मात्र अस्तित्वात असलेल्या नोटा बदलून घेण्यासाठी काही काळ मुदतही दिली. ही मुदत संपल्यानंतर अनेक ठिकाणी जुन्या नोटांचे घबाड सापडले. जुन्या नोटा बदलून देण्याची प्रक्रिया आता जवळपास बंद झाली आहे. मात्र त्यानंतरही जुना नोटा बदलून देण्याचे अमिष दाखवून उल्हासगरात एका व्यक्तीला सहा जणांनी तब्बल ६७ लाखांची गंडा घातला आहे.

मनोहरसिंग प्रकाश ठाकुर (३०) असे या व्यापाऱ्याचे नाव असून त्यांच्या परिचयाच्या कपिल कथोरे याने जुन्या नोटा बदलून देण्याचे आश्वासन ठाकूर यांना दिले होते. १ कोटीच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी संबंधितांना १२ लाख द्यावे लागतात. तर एक कोटी रूपये बँकेतून बदलून घेतल्यास आपल्याला एक कोटीच्या बदल्यात २० लाख रूपये बँकेकडून मिळतात. मात्र या प्रक्रियेतील काही व्यक्तींना पाच लाख रूपये दयावे लागतील. तर उर्वरित उर्वरीत १५ लाख रूपये फिर्यादी यांना मिळतील असे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे आरोपीनीं ठाकूर यांचा विश्वास संपादन करून त्यांना पाच कोटी रूपयांच्या जुन्या नोटा देण्यासाठी वेळोवेळी तब्बल ६० लाख रूपये घेतले.

तसेच अनिल रामचंदानी, नितीन बनसोडे, संजय कमलाकर सावंत उर्फ भाऊ, कपील कथोरे, त्याचा भाऊ आणि इम्रान खान यांनी फिर्यादी यांना पाच कोटी बदलून देतो असे सांगुन ठाकूर यांना एकदा उल्हासनगरच्या कॅम्प दोन भागातील गोल मैदान येथे पैसे आणण्यास सांगितले. त्याचवेळी तेथे तोतया पोलिसांना बोलावून पाच कोटी रूपयाच्या जुन्या नोटा जवळ बाळगल्या म्हणुन ठाकूर यांना रंगेहात पकडल्याचा बनाव करून पुन्हा साडे सात लाख रूपये उकळले. त्यामुळे पाच कोटी रूपये बदलण्याच्या प्रक्रियेत तक्रारदार ठाकूर यांना या सहा भामट्यांनी ६७ लाख ५० हजार रूपयांचा गंडा घातला आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ठाकूर यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. अखेर कपील कथोरे, त्याचा भाऊ, अनिल रामचंदानी, नितीन बनसोडे, संजय कमलाकर सावंत उर्फ भाऊ आणि इम्रान खान अशा सहा जणांविरूद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पाच कोटींच्या जुन्या नोटा बाळगल्याप्रकरणी आता तक्रारदार मनोहरसिंग ठाकूरही अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त होते आहे.