ठाणे : यशस्वी महिला बचत गटांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील ३ हजार ३७० महिला बचत गटांना विविध उद्योग उभारणीसाठी गेल्या आर्थिक वर्षात तब्बल १९१ कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले आहे. तर २१ कोटी ९४ लाख रुपयांचा खेळता भांडवल निधी उपलब्ध करून दिला आहे. यामुळे जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या स्वयंरोजगाराच्या चळवळीला एक नवे बळ मिळाले असून महिलांना उद्योग वाढीसाठी मोठी मदत झाली आहे. तर सध्या सुरु असलेल्या उद्योग वाढीसाठी भरीव निधीची तरतूद देखील झाली आहे.
ठाणे जिल्ह्यात सध्या १० हजार ९९७ महिला बचत गट कार्यरत असून एक लाखापेक्षा अधिक महिला या गटांशी जोडल्या गेल्या आहेत. राज्य ग्रामीण जीवन्नोती उमेद अभियाना अंतर्गत बचत गटांसाठी विविध उपायोजना राबविण्यात येत असतात. या अभियाना अंतर्गतमहिला बचत गटांना विविध लघु उद्योग सुरू करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्याबरोबर प्रशासनाच्या वतीने आर्थिक साहाय्य देण्यात येते. या आर्थिक मदतीने बचत गटांतील महिला शेळीपालन, कुक्कटपालन, शेती, शिवणकाम, खानावळ, खाद्य पदार्थांच्या गाड्या, मसाले, पापड, लोणची तयार करणे तसेच विविध शोभेच्या वस्तू बनविणे यांसारखे लघु उद्योग सुरू करतात. २२-२३ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील २,६१३ बचत गटांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने ७५ कोटी ५७लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले होते.
प्रशासनाच्या वतीने मिळालेल्या या आर्थिक साहाय्यामूळे करोना काळात आपल्या लघु उद्योगाची घडी विस्कटलेल्या बचत गटांना नव्याने उभारी मिळाली होती. याच पद्धतीने गेल्या आर्थिक वर्षात महिला बचत गटांना जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून महिला बचत गटांना भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. महिला बचत गटांना उद्योगांच्या माध्यमातून आर्थिक दृष्टया सक्षम करणे महत्वाचे असून यासाठी विविध बँकांच्या माध्यमातून त्यांना पतपुरवठा करून देण्यात आला असल्याची माहिती प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांनी सांगितले आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये महिला बचतगट कार्यरत आहेत. मात्र यामध्ये प्रामुख्याने ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तसेच काही अंशी शहरी भागात देखील चालणाऱ्या बचत गटांकडून विविध उद्योगांचे यशस्वी प्रयोग करण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने दुग्ध व्यवसाय, शेती आणि खाद्य उद्योगांचा समावेश आहे. या उद्योगांच्या आधारे जिल्ह्यातील बचत गटातील महिला स्वतः आर्थिक दृष्टया स्थिर स्थावर होत असून त्यांना एक हक्काचा रोजगार उपलब्ध झाला आहे. यासाठी गेल्या आर्थिक वर्षात विवीध बँकांच्या माध्यमातून जिल्ह्यातील ३ हजार ३७० महिला बचत गटांना विविध उद्योग उभारणीसाठी गेल्या आर्थिक वर्षात तब्बल १९१ कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले आहे. तर २१ कोटी ९४ लाख रुपयांचा खेळता भांडवल निधी उपलब्ध करून दिला आहे.