डोंबिवली शहरात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण बेसुमार वाढले आहे. त्याचा फटका एका महिला डॉक्टरला बसला. डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रस्त्यावर दुपारी दोनच्या सुमारास पतीसह दुचाकीवरून चाललेल्या एका महिला डॉक्टरला पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दुचाकी स्वारांनी जोरदार धक्का दिला. या झटापटीत या डॉक्टर महिलेच्या हातामधील महागडा मोबाईल हिसकावून चोरटे पळून गेले.
डॉ.मीनाक्षी जीगर संघवी असे डॉक्टरचे नाव आहे. त्या मानपाडा रस्त्यावरील विजया बँकेच्या समोरील सोसायटीत राहतात. डॉ. मीनाक्षी संघवी आपल्या पतीसह दुचाकीवरून मानपाडा रस्त्याने दुपारी दोनच्या सुमारास चालल्या होत्या. गावदेवी मंदिर नाना नानी पार्क येथून जात असताना, अचानक दोन तरूण दुचाकीवरून डॉक्टर महिला जात असलेल्या दुचाकीच्या पाठीमागून आले. ते पुढे निघून जातील असे वाटत असतानाच दुचाकीवरील तरूणांनी जोराने डॉक्टर पती, पत्नी बसलेल्या दुचाकीला धडक देण्याचा प्रयत्न केला. दुचाकीच्या पाठीमागे बसलेल्या डॉ. मीनाक्षी संघवी यांना दुचाकीच्या पाठीमागे बसलेल्या तरूणाने जोराने धक्का देऊन त्यांच्या हातामधील १४ हजार रूपये किमतीचा मोबाईल हिसकावून पळ काढला.
अचानक झटपटीचा प्रकार घडल्याने डॉक्टर पती, पत्नी गोंधळले. तोपर्यंत भुरटे चोर पळून जाण्यात यशस्वी झाले. डॉ.मीनाक्षी यांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली. पोलीस उपनिरीक्षक एम. पी. मुंजाळ यांनी मानपाडा रस्त्यावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. डोंबिवली पश्चिमेत असेच प्रकार गेल्या काही दिवसांपासून वाढले आहेत.
पुलांच्या ठिकाणी सीसीटीव्हीची मागणी
कोपर, ठाकुर्ली उड्डाण पुलांच्या दोन्ही बाजुला पालिकेने सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी. ज्यामुळे चोरट्यांना पकडणे शक्य होणार आहे. शहराबाहेर पळून जाताना चोरटे कोपर, ठाकुर्ली पुलाचा वापर करतात. या दोन्ही पुलांच्या ठिकाणी सीसीटीव्हीची नजर असेल तर भुरट्या चोरांना पकडणे पोलिसांना सहज शक्य होणार आहे. सध्या विष्णुनगर पोलीस ठाकुर्ली उड्डाण पुलाच्या पश्चिम बाजुला दररोज संध्याकाळी सात ते रात्री उशिरापर्यंत नाकाबंदी करतात. त्यामुळे बेशिस्त वागणारे तरूण, चोरटी वाहने, अवैध वाळू उपसा ट्रक, भुरटे चोर यांच्या हालचाली मंदावल्या आहेत. अशीच गस्त रामनगर पोलिसांनी कोपर उड्डाण पूलवर दररोज संध्याकाळी सात ते रात्री उशिरापर्यंत घालण्याची मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.