अंबरनाथ : १३३ कोटी रुपयांची थकीत पाणी बिलांची वसुली करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील ग्राहकांसाठी अभय योजनेची घोषणा केली आहे. येत्या महिनाभरात या योजनेत सहभागी होण्यासाठी प्राधिकरणाच्या कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे. पहिल्या तीन महिन्यात बिलाची मुद्दल अदा करणाऱ्या ग्राहकांना विलंब शुल्कात १०० टक्के सूट मिळणार आहे.

राज्यभरात विविध महापालिका, नगरपालिकांमध्ये पाणीपुरवठा योजना राबवणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाणीपट्टीपोटी मिळणारी थकबाकी मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे या थकबाकी वसुलीसाठी प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र  जीवन प्राधिकरणाच्या वरिष्ठ स्तरावर हालचाली सुरू होत्या. तसेच करोनाच्या संकटात पाणीबिले भरण्याकडे पाठ फिरवणाऱ्या ग्राहकांचीही आर्थिक अडचण समजून एकूण बिलातील विलंब शुल्क माफ करणारी ‘अभय योजना’ लागू करण्याची मागणी ग्राहकांसह लोकप्रतिनिधींनीही केली होती.

अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनीही याबाबत पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने राज्यभरातील महापालिका, नगरपालिका आणि  ग्रामीण क्षेत्रातील पाणीपुरवठा योजना असलेल्या ठिकाणी थकीत पाणी बिले वसूल करण्यासाठी अभय योजनेची घोषणा केली आहे. यात अंबरनाथ आणि बदलापूर शहरांचाही समावेश आहे.

या दोन्ही शहरातील पाणी व्यवस्थापनाची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची आहे. या दोन्ही शहरांमध्ये सुमारे ८० हजार ग्राहक असून त्यांच्याकडून १३३ कोटी ८५ लाख ६ हजार इतकी विलंब शुल्कासह थकबाकी येणे शिल्लक आहे. त्यात ८१ कोटी ७४ लाख ७३ हजारांच्या मूळ मुद्दलीचा तर ५१ कोटी १० लाख ४३ हजार रुपयांच्या विलंब शुल्काचा समावेश आहे.

योजना अशी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या या योजनेत सहभागी होण्यासाठी ग्राहकांना २१ फेब्रुवारी २०२२ पर्यंत जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात अभय योजनेत सहभाही  होणार असल्याचा अर्ज करायचा आहे. डिसेंबर २०२१ पर्यंतच्या थकीत बिलांचा यात समावेश असणार आहे. योजनेत सहभागी झाल्यानंतर पहिल्या तीन महिन्यात एकरकमी मुद्दल भरल्यास विलंब शुल्कामध्ये १०० टक्के सूट मिळणार आहे. तर दुसऱ्या तिमाहीत मुद्दल एकरकमी भरल्यास विलंब शुल्कामध्ये ९० टक्के सूट मिळेल. तिसऱ्या तिमाहीत बिल अदा केल्यास विलंब शुल्कात ८० टक्के तर त्यानंतरच्या चौथ्या तिमाहीत बिल अदा केल्यास विलंब शुल्कात ७० टक्के सूट मिळणार आहे.