नवीन रस्ते, उड्डाणपूल, उन्नत मार्गिका उभारणीच्या हालचाली; ‘एमएमआरडीए’च्या बैठकीत निर्णय

जयेश सामंत, सागर नरेकर

ठाणे : मुंबई महानगर प्रदेशात झपाटय़ाने वाढणारी लोकसंख्या आणि त्यामुळे निमाण होणाऱ्या वाहतुकीच्या समस्या लक्षात घेता येत्या काळात ठाणे तसेच आसपासच्या शहरांमधील वाहतूक प्रकल्पांना गती देण्याचा निर्णय मुंबई महागनगर प्राधिकरणाने घेतला आहे. महानगर क्षेत्रातील विशेषत: ठाणे जिल्ह्यातील वाहतूक पयायांचा विचार करण्यासाठी तसेच उड्डाणपूल, बाह्यवळण माग, कोस्टल रोडसारख्या नव्या प्रकल्पांचा सर्वकक्ष नव्याने अभ्यास करण्यास एमएमआरडीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत नुकतीच मान्यता देण्यात आली.

 मुंबई आणि विशेषत: ठाणे जिल्ह्यातील विविध परिवहन मार्गाची सुसाध्यता तपासून त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल या माध्यमातून तयार केला जाणार आहे. याशिवाय ठाणे आणि उपनगरातील शहरांमधील वाहतूक सुखकर करण्यासाठी विविध प्रकल्पही यानिमित्ताने प्रस्तावित करण्यात आले आहेत.

ठाणे जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील औद्योगिकदृष्टय़ा प्रगत जिल्ह्यांपैकी एक जिल्हा म्हणून ओळखला जातो. लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून २०११ च्या जनगणनेनुसार ठाणे जिल्हा हा राज्यातला तिसरे सर्वाधिक  लोकसंख्येचा जिल्हा आहे. ठाणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ ४ हजार २९४ चौरस किलोमीटर आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, भिवंडी या औद्योगिक तालुक्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर लोकसंख्या वाढते आहे. भविष्यात मुंबई महानगर प्रदेशामध्ये प्रचंड आंतरशहर वाहतूक होईल असे प्राधिकरणाने  मुंबई महानगर प्रदेशासाठी तयार केलेल्या र्सवकष परिवहन अभ्यासात हे नमूद केले आहे. बृहन्मुंबईतून ही वाहतूक निर्माण होणार असून नजिकच्या महानगरपालिका क्षेत्रांमध्ये विशेषत: ठाणे महानगरपालिका, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये याचे परिणाम जाणवू लागले आहेत. या क्षेत्रांमध्ये प्रचंड वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता लक्षात घेता वाहतूक सुसाध्य अशा प्रकल्पांचा अभ्यास करण्यासाठी नव्याने कार्यवाही सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नियोजित मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्ग, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग तसेच ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई इत्यादी ठिकाणी होत असलेल्या विविध विकासामुळे भविष्यात शहरांतर्गत वाहतूक कोंडी निर्माण होण्याची भीती यापूर्वीही व्यक्त झाली आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी र्सवकष परिवहन अभ्यासात काही प्रकल्प प्रस्तावित  करण्यात आले आहेत. यात रस्ते, रेल्वे, मेट्रो मार्ग, उड्डाणपूल यांचा समावेश करण्यात आला आहे.

मुंबई महानगर क्षेत्राचा आणि विशेषत: ठाणे जिल्ह्याचे झपाटय़ाने होणारे नागरीकरण लक्षात घेता या संपूर्ण पट्टयातील वाहतूक नियोजनाचा फेरआढावा घेण्याची आवश्यकता आहे. यापूर्वी आखण्यात आलेले तसेच नव्याने आखले जाणारे प्रकल्प, आवश्यक वाहतूक पर्याय तसेच कालमयादा निश्चितीची आवश्यकता लक्षात घेता र्सवकक्ष अशा परिवहन अभ्यासाची गरज आहेच. त्यामुळे यासंबंधीच्या अहवालातील शिफारशी पुढील नियोजनासाठी आवश्यक आणि परिणामकारक ठरू शकतील.

एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्री

अहवालाची गरज

ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि सभोवतालच्या क्षेत्रांमधील आणि प्राधिकरणाने विविध रस्ते, पूल यांसारख्या प्रकल्पांची गरज ओळखून व वाहतूक, परिवहन परिस्थितींचे विश्लेषण करून सदर प्रकल्पांचा अभ्यास करण्याकरिता आणि सध्याच्या प्रवासाच्या परिस्थितींचा आढावा घेऊन त्यांच्या प्रभावानुसार टप्याटप्प्याने सदर प्रकल्पांचे नियोजन करण्याची शिफारस केली आहे. प्राधिकरणाने नवी दिल्लीच्या मे. ली. असोसिएटस साउथ एशिया प्रा. लि. आणि कॅनडाच्या मे. ली. इंटरनॅशनल यांना ठाणे शहरातील प्रस्तावित प्रकल्पामुळे ठाणे शहरातील वाहतुकीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करून त्यांची गरज ओळखण्याकरिता र्सवकष परिवहन अभ्यास करण्यासाठी नेमले होते. हा अहवाल सप्टेंबर महिन्यात सादर करण्यात आला होता.