फेरीवाल्यांशी झालेल्या वादानंतर प्रवाशाची रुळांवर उडी; अंबरनाथ लोकलची धडक
ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील फेरीवाल्यांशी वाद घालून स्थानकात पळत आलेल्या राहुल मसुले याचा रेल्वे रुळांवर पडून मृत्यू झाला. रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. ठाणे नगर पोलीस ठाण्यात राहुलच्या मित्राच्या तक्रारीवरून फेरीवाल्याविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कोणालाही अटक करण्यात आली नसली तरी फेरीवाल्यांसोबतच्या वादातूनच हा अपघात झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
आसनगाव येथे राहणारा राहुल मसुले गुरुवारी दुपारी ठाण्यातील रुग्णालयात दाखल असलेल्या मित्राला पाहण्यासाठी आला होता. मात्र संध्याकाळी परतत असताना त्याने मद्यप्राशन केले. सॅटिसजवळील आंबेडकर पुतळ्याजवळ त्याने फेरीवाल्याकडील फटाके वाजवण्याची बंदूक घेतली. पैसे देण्यावरून त्यांच्यात वाद झाले. त्यानंतर पैसे देणे टाळून तो स्थानकाकडे निघाला. तो धावत रेल्वे स्थानकात आला. फलाट क्रमांक दोनवरील रुळावर त्याने उडी मारली आणि त्याच दरम्यान आलेल्या अंबरनाथ लोकलखाली सापडून त्याचा मृत्यू झाला. राहुल धावत येऊन अपघात झाल्याचे दृश्य सीसी टीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाले आहे. यात चूक कोणाची याविषयी संभ्रम असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
राहुल मसुले अपघातप्रकरणी नोंद करण्यात आली असून तेथील फेरीवाल्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. मात्र ते भांडण रेल्वे पोलिसांच्या हद्दीबाहेर झाले असल्याने या प्रकरणी तपास करण्यासाठी फेरीवाल्यांना ठाणे नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
–रवींद्र दळवी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ठाणे रेल्वे पोलीस
फेरीवाला आणि राहुल मसुले यांच्यात क्षुल्लक कारणावरून भांडण झाले होते. त्यानंतर त्याचा अपघातात मृत्यू झाला. या प्रकरणी राहुल याच्या मित्राच्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. तपास सुरू आहे.
–एम. व्ही. धर्माधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ठाणेनगर पोलीस