उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये एका उपहारगृहात किरकोळ कारणावरून हाणामारी व चाकू दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. राम नाश्ता हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याशी वाद घालून, त्याला मारहाण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी मॉन्टी बहादुर करोतीया, त्याचा सहकारी सचिन करोतीया आणि इतर साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने भजी ऑर्डर केली होती. मात्र भजीसोबत आरोपीला कांदा खाण्यासाठी हवा होता. हा कांदा देण्यास उशिर झाल्याने आरोपीने थेट कामगाराला मारहाण केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे राम नाश्ता हॉटेलमध्ये नेहमीप्रमाणे काम करत असताना, आरोपी मॉन्टी करोतीया आणि त्याचा साथीदार हॉटेलमध्ये आले. त्यांनी खाण्यासाठी भजी प्लेट मागितली. मात्र कांदा देण्यात थोडा उशीर झाल्यामुळे आरोपी रागावला. याच रागातून सचिन करोतीया याने फिर्यादीच्या छातीला धक्का दिला आणि गालावर मारहाण केली. त्यानंतर हॉटेलमालक आणि कुडलीक मोरे हे मध्यस्थी करण्यासाठी पुढे आले असता त्यांनाही आरोपींनी शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. इतक्यावरच न थांबता आरोपी मॉन्टी करोतीया हॉटेलच्या बाहेर गेला आणि चाकूसारखे धारदार हत्यार घेऊन परत आला.

हत्यार हवेत फिरवत त्याने फिर्यादीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि उपस्थित लोकांना धमकी दिली. कोणी मध्ये येणार नाही, आले तर कापून टाकेल, अशी धमकी त्याने यावेळी दिली. या धमकीनंतर परिसरातील नागरिकांनी घाबरून आपापली दुकाने बंद केली व सुरक्षिततेसाठी आत लपले. दरम्यान, आरोपीने पुन्हा एकदा दमदाटी करून घटनास्थळ सोडले.

फिर्यादीने तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन घटनेची माहिती दिली. यावरून संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. हाणामारी, दमदाटी, धारदार शस्त्र दाखवणे व जीवे मारण्याची धमकी या गंभीर आरोपांखाली आरोपींविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. स्थानिक व्यापारी व नागरिकांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्याची मोहीम सुरू आहे. लवकरच संबंधित आरोपींना ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.