डोंबिवली – डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील स्कायवाॅक खाली असलेल्या रस्ता दुभाजकावर ठाण मांडून बसणाऱ्या फेरिवाल्यांवर ग प्रभागाच्या फेरीवाला हटाव पथकाने शुक्रवारी सकाळी कारवाई केली. या कारवाईत फेरिवाल्याचे साहित्य जप्त करण्यात आले.
डोंंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील पाटकर रस्ता आणि त्यावरील स्कायवाॅकचा भाग हा फ प्रभागाच्या हद्दीत येतो. या रस्ते हद्दीवरून फ आणि ग प्रभागात वाद आहे. पाटकर रस्ता आणि त्यावरील स्कायवाॅकचा भाग हा फ प्रभागाच्या हद्दीत येतो. याठिकाणी फेरीवाले नियमित बसतात. तरीही फ प्रभागाकडून येथील फेरीवाल्यांवर कारवाई केली जात नाही. हा भाग ग प्रभागाच्या हद्दीत येतो, असे वरिष्ठांना सांगून फ प्रभाग कर्मचारी जबाबदारी झटकत असल्याच्या तक्रारी आहेत.
हेही वाचा >>>ठाण्यात वाढत्या प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर पीयूसी तपासणी मोहिम; ८२ वाहनचालकांकडून ८३ हजार रुपयांचा दंड वसूल
आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनीही या वादावरून नाराजी व्यक्त केली होती. हद्दीचा वाद न करता फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे आयुक्तांचे आदेश दांगडे यांनी दिले होते. पाटकर रस्त्यावरील रस्ता दुभाजकाचा आडोसा आणि तेथील आसनावर फेरीवाले ठाण मांडून बसत असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने शुक्रवारी प्रसिध्द केले. अखेर ग प्रभाग फेरीवाला हटाव पथकाने पाटकर रस्ता, कामत मेडिकल पदपथ, डाॅ. राॅथ रस्ता, रामनगर रेल्वे तिकीट खिडकी, राजाजी पथ भागातील फेरीवाल्यांवर कारवाई करून त्यांचे साहित्य जप्त केले. या फेरीवाल्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. जे फेरीवाले वारंवार समज देऊनही रस्ते, पदपथ अडवून व्यवसाय करत आहेत. त्यांच्यावर वरिष्ठांची परवानगी घेऊन फौजदारी कारवाई केली जाणार आहे, असे ग प्रभागाचे फेरीवाला हटाव पथक प्रमुख राजेंद्र साळुंखे यांनी सांगितले. ग प्रभाग हद्दीत एकही फेरीवाला रस्त्यावर दिसता कामा नये, असे आदेश साहाय्यक आयुक्त सोनम देशमुख यांनी पथकाला दिले आहेत.
हेही वाचा >>>कल्याण पूर्वेतील काँक्रीट रस्त्यांसाठी ४५४ कोटीचे प्रस्ताव; २० रस्त्यांसाठी ‘एमएमआरडीए’कडे निधीची मागणी
पाटकर रस्ता भागात स्कायवाॅक खाली असलेल्या दुभाजकावर, पदपथावर सकाळीच दारू पिऊन बसलेल्या मदयपी, गर्दुल्ल्यांना पथकाकडून हटविण्यात आले. रामनगर पोलिसांपासून हाकेच्या अंतरावर हा भाग येतो. पोलिसांनी याठिकाणी संध्याकाळच्या वेळेत गस्त ठेऊन उघड्यावर दारू पिणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. रस्ता दुभाजकाच्या ठिकाणी दुचाकी उभ्या करून रिक्षा वाहतुकीला, पादचाऱ्यांना येजा करण्यासाठी अडथळा केला जातो. त्यांची माहिती पालिकेकडून वाहतूक विभागाला देण्यात येणार आहे.
ग प्रभाग फेरीवाला हटाव पथक सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत फेरीवाल्यांवर कारवाई करत असल्याने रामनगर, राजाजी रस्ता, राॅथ रस्ता, शिवमंदिर रस्ता, रामनगर तिकीट खिडकी, उर्सेकरवाडी परिसर मोकळा असतो. डोंबिवली पश्चिमेत ह प्रभाग हद्दीत फेरीवाल्यांवर कारवाई सुरू आहे. ह प्रभाग फेरीवाला हटाव पथकाने रेल्वे स्थानक भागात तळ ठोकून बसण्यापेक्षा महात्मा फुले रस्ता, गुप्ते रस्ता, सुभाष रस्ता, गरीबाचापाडा, नवापाडा, जुनी डोबिवली, कोपर, मोठागाव, उमेशनगर, रेतीबंदर भागात रस्ता, पदपथ अडवून व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.