ठाणे जिल्हा उपनिबंधकांचा इशारा
ठाणे : जिल्ह्य़ातील गृहसंकुलांमध्ये वृत्तपत्र वितरण करणाऱ्या विक्रेत्यांना येण्यास मज्जाव केला तर संबंधित गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांना पदावरून हटवण्यात येईल, असा इशारा जिल्हा उपनिबंधकांनी दिला आहे. करोनाच्या पाश्र्वभूमीवर अनेक गृहनिर्माण संस्थांतील पदाधिकारीच वृत्तपत्र वितरणाला मज्जाव करत असल्याच्या तक्रारी आल्याने जिल्हा उपनिबंधकांनी लेखी आदेश काढून गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना तंबी दिली आहे.
करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेली टाळेबंदी जून महिन्यात शिथिल करण्यात आली. त्यामध्ये ७ जूनपासून वृत्तपत्र वितरणास परवानगी देण्यात आली होती. मात्र, काही गृहसंकुलांच्या पदाधिकाऱ्यांकडून मनमानी कारभार केला जात आहे. वृत्तपत्रांमुळे करोना संसर्ग होत नसल्याचे केंद्र शासनाने यापूर्वीच स्पष्ट केले असतानाही अनेक गृहसंकुलांचे पदाधिकारी वृत्तपत्रामुळे करोनाचा संसर्ग होण्याची भीती दाखवून वृत्तपत्र वितरणास विरोध करीत होते. तसेच वृत्तपत्र वितरणासाठी येणाऱ्या विक्रेत्यांना गृहसंकुलात प्रवेश दिला जात नव्हता, तर काही गृहसंकुलांत सुरक्षारक्षकाकडे वृत्तपत्र ठेवण्याचा नियम करण्यात आला होता. या संदर्भात ‘लोकसत्ता’मध्ये १८ जूनला वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशननेही जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी गृहनिर्माण संस्थांनी वृत्तपत्र विक्रेत्यांना गृहसंकुलात येण्यास मज्जाव करू नये, असे स्पष्ट केले होते. तसेच केंद्र आणि राज्य शासनाचे आदेश गृहनिर्माण संस्थांना अवगत करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा उपनिबंधकांना केल्या होत्या. त्यानुसार बुधवारी जिल्हा उपनिबंधक शहाजी पाटील यांनी लेखी आदेश काढून गृहसंकुलांमध्ये वृत्तपत्रे वितरणास येणाऱ्या विक्रेत्यांना रोखू नका, असे निर्देश दिले. वृत्तपत्र विक्रेत्याला गृहनिर्माण संस्थांतील पदाधिकाऱ्याने अटकाव केला तर त्याची चौकशी करण्यात येईल. संबंधित पदाधिकारी दोषी आढळल्यास त्याला पदावरून काढून टाकले जाईल, असे शहाजी पाटील यांनी सांगितले.