कामण येथील सरकारी जागेवरील ५५ हजार चौरस फुटांचे बांधकाम जमीनदोस्त
लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
वसई : वसईतील भूमाफियांच्या विरोधात पालिकेने बुधवारी सकाळी अचानक अतिक्रमणविरोधी कारवाई केली. वसई पूर्वेच्या कामण येथे झालेल्या कारवाईत ५५ हजार चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून पालिकेने शासकीय आणि वनजमिनींवर अतिक्रमण करणाऱ्यांच्या विरोधात मोहीम उघडली होती. मागील आठवडय़ात पेल्हार येथे कारवाई केल्यांतर बुधवारी वसई पश्चिमेच्या ‘जी’ प्रभागात कारवाई कऱ्ण्यात आली. भूमापन क्रमांक ५७ (सव्र्हे नंबर) मध्ये बांधण्यात आलेले व्यावसायिक गाळे, गोदामे जमीनदोस्त करण्यात आले. दुपापर्यंत पालिकेने ५५ हजार चौरस फुटांवरील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली होती.
पालिकेचे अतिरिक्त आयुक्त आशीष पाटील, अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख प्रेमसिंह जाधव, प्रभाग समिती ‘जी’ चे प्रभारी साहाय्यक आयुक्त राजेंद्र कदम यावेळी उपस्थित होते. कसलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
कारवाईबाबत गोपनीयता
पालिकेच्या अधिकाऱ्यांनी यावेळी कारवाईबाबत गोपनीयता बाळगली होती. सकाळी अतिक्रमणविरोधी पथकाच्या कर्मचाऱ्यांना अचानक निघण्यास सांगण्यात आले. मात्र कुठे जायचे आहे ते सांगितले नव्हते. सर्वाचे मोबाइल बंद करण्यात आले होते. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी देखील कारवाईच्या वेळी आपले मोबाइल बंद ठेवले होते. फोन सुरू असल्यास कारवाईच्या वेळी विविध ठिकाणांहून दबाव येतो, त्यामुळे आम्ही मोबाइल बंद ठेवतो असे एका अधिकाऱ्यांने सांगितले.
