सहा महिन्यांत ७८ गुन्हे, २३ अटकेत; शेकडो लिटर दारू नष्ट
राज्य उत्पादक शुल्क विभागाने गावठी दारूवर धडक कारवाई सुरू केली आहे. गेल्या सहा महिन्यांत नालासोपारा आणि विरारमध्ये छापे टाकून दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. एकूण ७८ गुन्हे दाखल करून २३ जणांना अटक करण्यात आली आहे. जप्त केलेले रसायन आणि शेकडो लिटर दारू नष्ट केली आहे.
नालासोपारा आणि विरारमध्ये मोठय़ा प्रमाणात छुप्या पद्धतीने बेकायदा गावठी दारू तयार केली जाते. गावठी हातभट्टीच्या दारूवर बंदी असताना हे अड्डे सुरू होते. चोरटय़ा मार्गाने वाहतूक करून ही दारू ठाणे, मुंबई आणि पालघरमध्ये वितरित केली जात असते. त्यामुळे त्यांच्यावर राज्य उत्पादक शुल्क विभागाने कारवाई सुरू केली होती. पोलीस अधीक्षक बी. एन. लिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक निरीक्षक नितीन संखे, के. आर. खरपडे आणि एस. आर. हडलकर यांचा समावेश असलेले विशेष पथक स्थापन करण्यात आले. या पथकाने विरारच्या सातपाडा, नालासोपारा येथील बरफपाडा, संतोष भुवन, कळंब आदी विविध ठिकाणीे छापे टाकले होते. गेल्या सहा महिन्यांत विभागाने तब्ब्ल ७८ गुन्हे दाखल करून २३ जणांना अटक केली. आतापर्यंत झालेल्या कारवाईत ४४ हजार लिटर रसायन आणि ५४३ लिटर हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली होती. ही सर्व दारू आणि रसायने पंचनामा करून नष्ट करण्यात आल्याची माहिती नितीन संखे यांनी दिली.