ठाणे : भिवंडी शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून शहरातील बेकायदा रिक्षांवर परिवहन विभागामार्फत कारवाई करण्याचे निर्देश पालिका आयुक्त अनमोल सागर यांनी दिले आहेत. तसेच परिवहन विभाग, पोलीस विभाग आणि महापालिका अशा तिन्ही यंत्रणांनी एकत्रितपणे शहरातील बेकायदा रिक्षा थांब्यांवरही कारवाई करावी, असे निर्देशही त्यांनी दिले. शहरातील रस्त्यांवरील, उड्डाणपुलाखालील बेवारस वाहने तात्काळ उचलावीत, अशा सुचनाही त्यांनी केल्या.
भिवंडी शहरात गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडी होत आहे. हि कोंडी होण्यामागची कारणे शोधून त्यावर उपाययोजना करण्याचे काम पालिका आयुक्त अनमोल सागर यांनी सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकारण करण्यासाठी कृती समितीची स्थापना केली आहे. त्यात पालिका आणि पोलिस विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या समितीची बैठक बुधवारी आयुक्त सागर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीस अतिरीक्त आयुक्त देविदास पवार, विठ्ठल डाके, उपायुक्त (अतिक्रमण) विक्रम दराडे, सहायक पोलीस आयुक्त (पुर्व) देशमुख, सहायक पोलीस आयुक्त (पश्चिम) शरद ओहोळ, शहर अभियंता जमील पटेल, पोलीस निरीक्षक (वाहतूक) सुधाकर खोत, रवी साठे, परिवहन अधिकारी, प्रभाग अधिकारी प्रभाग समिती क्र.१ ते ५, पाणीपुरवठा, बांधकाम, विद्युत या विभागाचे अभियंते, संबंधित विभागप्रमुख उपस्थित होते.
शहरातील अनधिकृत, विनापरवाना रिक्षांवर परिवहन विभागामार्फत कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त सागर यांनी सबंधितांना बैठकीत दिले. तसेच, शहरातील वाहतूकीचा भार कमी करण्यासाठी मुदत बाह्य वाहने, विनापरवाना वाहने, फिटनेस प्रमाणपत्र नसलेली वाहने यांची विशेष शोध मोहीम पुढील दोन महिने सुरू ठेवण्याबाबत पोलीस विभागाने बैठकीत विनंती केली. शहरातील अनधिकृत रिक्षा थांब्यांवर परिवहन विभाग, पोलीस विभाग आणि महापालिका यांनी एकत्रितपणे कारवाई करावी. तसेच, शहरातील रस्त्यांवरील, उड्डाणपुलाखालील बेवारस वाहने संबंधित मालकांनी तेथून हटवावीत. अन्यथा बेवारस वाहन म्हणून स्टिकर चिकटवण्यात येऊन, मुदतीनंतर जप्तीची कारवाई परिवहन विभागामार्फत करण्यात येईल. तसेच या बेवारस वाहनांची तातडीने विल्हेवाट लावण्याची जबाबदारी परिवहन विभागाची राहील असे आयुक्तांनी बैठकीत सांगितले. महापालिकेने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उभारलेले वाहनतळ बंदावस्थेत असून ते नागरिकांना मोफत पार्किंगसाठी उपलबध करुन देण्याबाबत मालमत्ता विभागाने तपासुन तातडीने अहवाल सादर करावा, अशा सुचनाही त्यांनी दिल्याचे पालिकेचे माहिती व जनसंपर्क अधिकारी श्रीकांत परदेशी यांनी सांगितले.