आधारवाडी येथील क्षेपणभूमीवर कचरा टाकू नये असे आदेश उच्च न्यायालयाने देऊनही कल्याण-डोंबिवली पालिकेने या क्षेपणभूमीवर कचरा टाकणे सुरूच ठेवले आहे. या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी मनसेच्या कल्याणमधील पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी क्षेपणभूमीवर कचरा घेऊन जाणारी वाहने रोखून धरली.
न्यायालयाच्या आदेशाचा पालिकेकडून अवमान सुरू आहे. तसेच, प्रदूषण नियंत्रण मंडळही पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करीत नसल्याने मनसेने पालिका, एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांचा निषेध केला. तसेच, या दोन्ही व्यवस्थापनांच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात केली. आधारवाडी क्षेपणभूमीवर कचरा टाकणे पालिकेने सुरूच ठेवल्याने या भागात दरुगधी पसरली आहे. पावसाळ्यात हा प्रश्न आणखी गंभीर होण्याची शक्यता परिसरातील रहिवाशांनी वर्तवली आहे. न्यायालयाने फटकारूनही पालिका क्षेपणभूमीवर कचरा टाकणे बंद करीत नसल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी क्षेपणभूमीवर कचरा घेऊन जाणारी वाहने काही काळ रोखून धरली. या आंदोलनामुळे या भागात काही तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.