रुग्णसंख्या घटल्याने प्रशासनाचा निर्णय
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका नियंत्रित भिवंडीजवळील टाटा आमंत्रा करोना काळजी केंद्रात सध्या ८० करोना रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच २३९५ खाटांची क्षमता असलेल्या या केंद्रात गेल्या महिनाभरापासून १० ते २० करोना रुग्ण उपचारांसाठी दाखल होत असून तितकेच रुग्ण दररोज बरे होऊन घरी जात आहेत. करोना रुग्णांच्या संख्येत झालेली घट आणि त्या तुलनेत होणारा खर्च अवाढव्य आहे. त्यामुळे प्रशासनाने हे केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती या केंद्रातील समन्वयक उपअभियंता प्रमोद मोरे यांनी दिली.
टाटा आमंत्रा केंद्र बंद केल्यानंतर येथील सर्व करोना रुग्णांवरील उपचार सेवा शहाड येथील साई निर्वाणा करोना उपचार केंद्रात १ जानेवारीपासून दिल्या जाणार आहेत. मार्चमध्ये कल्याण-डोंबिवलीत करोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यावर शासनाने पालिकेला भिवंडी बाह्यवळण रस्त्याजवळील टाटा आमंत्रा गृहनिर्माण प्रकल्पातील पाच ते १४ माळे करोना रुग्णांवर उपचारांसाठी उपलब्ध करून दिले होते. या ठिकाणी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या सूचनेप्रमाणे उपचार, रुग्णांचे भोजन, नाष्टा, औषध, रुग्णवाहिका, सेवक, नियंत्रक अधिकारी अशी व्यवस्था उभारण्यात आली होती. एप्रिलपासून सुमारे ४० ते ५० हजार करोना रुग्णांनी या केंद्रातून उपचार घेतले आहेत.
शहरात दिवाळीपासून करोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. अनेक रुग्ण आता घरीच विलगीकरणात राहून उपचार घेण्यास प्राधान्य देत आहेत. एखाद्या रुग्णाचे घर लहान, कुटुंब मोठे अशी अडचण असेल तरच तो रुग्ण पालिकेच्या संस्थात्मक विलगीकरणात उपचारांसाठी दाखल होतो. आठ महिन्यांपासून सुरू असलेल्या या केंद्रात काही दिवसांपासून दररोज १० ते २० रुग्ण उपचारांसाठी येतात आणि तेवढेच उपचार घेऊन दररोज बाहेर पडतात. या केंद्रात २३९५ रुग्णांवर उपचार करण्याची सुविधा असताना तिथे सध्या ७० ते ८० करोना रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्ण कमी झाले असले तरी यंत्रणा मात्र पूर्वीइतकीच आहे. ८०० ते ९०० कर्मचारी या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यामुळे वाढता खर्च, कर्मचाऱ्यांचे योग्य नियोजन करणे या विचारातून हे केंद्र बंद करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे.
या केंद्रात सध्या ८० करोना रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांच्या सेवेसाठी मोजके सेवेकरी तेथे ठेवले जातील. तेथे नवीन करोना रुग्ण दाखल करून घेण्याची प्रक्रिया बंद करण्यात आली आहे. हे रुग्ण साई निर्वाणा केंद्रात दाखल करून घेतले जात आहेत. ८० रुग्ण बरे होऊन घरी गेले की टाटा आमंत्रामधील पालिकेचे फर्निचर, इतर सामुग्री जमा करून आणली जाईल, असे मोरे यांनी सांगितले. सध्या पालिका हद्दीत सावळाराम महाराज क्रीडासंकुल, डोंबिवली जिमखाना, वसंत व्हॅली केंद्रात करोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत.
