प्रशासकीय चुकांचा स्थानिक वाहनचालकांना फटका

कल्याण : कोणत्याही ठोस नियोजनाशिवाय मोठय़ा गृह प्रकल्पांना दिली जाणारी परवानगी, नव्या रस्त्याच्या बांधणीमुळे जागोजागी निर्माण झालेले अडथळे, बेकायदा बांधकामांमुळे मोकळ्या जागा आणि प्रवाहांना लागलेला बांध यामुळे ठाणेपलीकडील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा शिळ-महापे रस्त्यासलग तिसऱ्या वर्षी पुरात सापडल्याचे चित्र रविवारी, सोमवारी दिसून आले.

मलंग गड डोंगररांगा, २७ गाव भागातील पावसाचे पाणी वाहाळ, नाले, लहान नद्यांमधून खाडीला जाऊन मिळत होते. गाव परिसरात भातशेती मोठय़ा संख्येने होती. शेतांमध्ये पावसाचे पाणी साचून राहायचे. माळरानावरील मोठय़ा खदानी (तलाव) पावसाचे वाहते पाणी रोखून धरायच्या. जागोजागी पाणी अडविण्यासाठी आणि वाहून जाण्यासाठी नैसर्गिक साधने होती. त्यामुळे मागील ६० ते ७० वर्षांत कल्याण-शिळफाटा रस्ता कधी पाण्याखाली गेला नाही, असे २७ गाव संघर्ष समितीचे सरचिटणीस चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. मात्र, अलीकडच्या काळात या मार्गावरील पूरस्थिती पाहून आश्चर्य वाटते, असे काटई गावचे ग्रामस्थ नरेश पाटील सांगतात.

कल्याण-शिळफाटा रस्त्याच्या पत्रीपूल ते कल्याण फाटा (दत्त मंदिर) दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजुला मोठे गृह प्रकल्प उभारले जात आहेत. या प्रकल्पांसाठी मातीचे ४० ते ५० फूट उंचीचे भराव केले जात आहेत. भराव करताना परिसरातील पाण्याचे नैसर्गिक प्रवाह, वाहाळ, नाले बुजविले जात आहेत. काही वर्षांपूर्वी शिळफाटा भागात गृहसंकुले उभारणाऱ्या एका बडय़ा विकासकाने गृह प्रकल्पात पाणी शिरू नये यासाठी मलंगगड खोऱ्यातून येणारे पावसाचे पाणी थेट तळोजा नदीकडे वळविले, अशा ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. मात्र, कृत्रिमपणे वळवलेले पाणी पातळी वाढल्यावर वाट मिळेल तेथे शिरते. त्यामुळे या परिसरातील अनेक गृहसंकुलांत चार ते पाच फूट पाणी साचते. दोन वर्षांपूर्वी या संकुलाच्या आवारात महापुरामुळे १५ ते २० फूट पाणी होते.

प्रशासनाचे दुर्लक्ष

शिळफाटा रस्त्यालगत घरे असलेल्या काही रहिवाशांनी पावसाळ्यात गटाराचे पाणी घरात घुसते म्हणून गटारे बुजवून टाकली. या महत्त्वपूर्ण विषयाकडे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, पालिका, एमआयडीसी यांचे लक्ष नाही. काही व्यावसायिकांनी गटारे बुजवून त्यावर आपले व्यवसाय सुरू केले आहेत. काही पेट्रोलपंप चालकांनी रस्त्यालगत माती, सिमेंटेचे दोन ते तीन फूट उंचीचे भराव करून रस्त्यावरील पाणी पेट्रोल पंप आवारात येणार नाही अशी व्यवस्था केली आहे. ढाबे, होटेल, वर्कशॉप, गॅरेज चालकांनी सोयीप्रमाणे रस्त्याकडेची जागा हडप करून तेथे मन मानेल त्याप्रमाणे उंचवटे तयार करून त्यावर आपली दुकाने थाटली आहेत. या सर्व बेकायदा बांधकामांना नियंत्रक यंत्रणा पाठीशी घालत असल्याने मुसळधार पावसाचा फटका शिळफाटा रस्त्याला सर्वाधिक बसला आहे.

बांधकाम विभागाच्या चुका

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ते बांधले जात असताना यापूर्वी १०० ते २०० मीटर अंतरावर, पाणी तुंबेल अशा ठिकाणी पाणी वाहून जाण्यासाठी मोऱ्या बांधल्या जात होत्या. शिळफाटा रस्त्याच्या एका बाजूचे पाणी दुसऱ्या बाजूला वाहून जाण्यासाठी २१ किमीच्या या रस्त्यावर एकही मोरी नाही, अशी माहिती मिळाली. व्यवस्थेचे शिळफाटा रस्त्यालगत होत असलेल्या बेकायदा गोष्टींकडे दुर्लक्ष, प्रकल्पांचे भराव हेच यापुढे शिळफाटा रस्त्याला जलमय करण्यास कारणीभूत ठरणार आहेत. यासंदर्भात एमएसआरडीसीचे मुख्य अभियंता शशिकांत सोनटक्के यांच्याशी सतत प्रयत्न करून त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

शिळफाटा रस्त्याची बांधणी योग्य रीतीने करा. गटारे, मोऱ्यांची बांधणी करा. अन्यथा येत्या काळात प्रवासी, रस्त्याकडेच्या गावांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल अशा तक्रारी यापूर्वी आपण शासनाकडे केल्या होत्या. या रस्ते बांधणीतील काही महत्त्वपूर्ण त्रुटी शासनाच्या निदर्शनास आणल्या होत्या. त्याची कधी कोणत्या यंत्रणेने दखल घेतली नाही. त्याचे दुष्परिणाम आता दिसण्यास सुरुवात झाली आहे.

– संदीप पाटील, वास्तुविशारद