बदलापूर : बदलापूर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक लोखंडी संरक्षक जाळी लावून बंद केल्यानंतर त्याचे पडसाद दररोज उमटत आहेत. त्यानंतर आता रेल्वे प्रशासनाने नव्याने रूपांतरीत करण्यात आलेल्या फलाट क्रमांक एकवर लोकल थांबण्याची जागा बदलली आहे. आता फलाट क्रमांक एकवर येणारी लोकल मुंबईच्या दिशेने दोन डब्बे आधीच थांबणार आहे. यापूर्वी लोकल याच ठिकाणी थांबत होती. मात्र होम फलाटाच्या कामासाठी लोकलची जागा बदलण्यात आली होती. शुक्रवारपासून याची अंमलबजावणी सुरू झाली. त्यामुळे सकाळी प्रवाशांची धावपळ पाहायला मिळाली.

बदलापूर रेल्वे स्थानकात गेल्या काही वर्षात प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र ज्या वेगाने प्रवासी वाढले त्या वेगाने रेल्वे स्थानकात सार्वजनिक सुविधा वाढल्या नाहीत. आजही बदलापूर रेल्वे स्थानकात फक्त फलाट क्रमांक तीनवरच स्वच्छतागृह आहे. तर त्याच फलाटावर स्वयंचलित जिना आहे. सध्या स्थानकात डेक उभारणीचे, नव्या पादचारी पुलांच्या उभारणीचे काम सुरू आहे. लवकरच फलाट क्रमांक दोन स्वयंचलित जीने आणि उद्वाहन उभारले जाणार आहे.

या दोन महत्वाच्या कामांसाठी फलाट क्रमांक एकला लोखंडी संरक्षक जाळी बसवून हा फलाट प्रवाशांसाठी बंद करण्यात आला आहे. तर होम फलाटाचा भाग असलेल्या फलाक क्रमांक एक अ हा फलाट क्रमांक एक म्हणून कार्यरत करण्यात आला आहे. या निर्णयाची रेल्वे प्रशासनाने वेगाने अंमलबजावणी केली. त्यानंतर स्थानकात प्रवाशांच्या समस्येत भर पडली. आधी लोकलच्या दोन्ही बाजूने चढता- उतरता येत होते. आता फक्त एकाच बाजूने चढावे आणि उतरावे लागत असल्याने प्रवाशांची कोंडी झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते आहे. फलाटावरही गर्दी होत असून चेंगराचेंगरीची स्थिती उद्भवण्याची भीती आहे.

त्यातच शुक्रवारपासून रेल्वे प्रशासनाने फलाट क्रमांक एकवर लोकल थांबण्याची जागा बदलली आहे. फलाट क्रमांक एकवर येणारी लोकल आता मुंबईच्या दिशेने दोन डब्बे मागेच थांबेल. यापूर्वीही लोकल त्याच जागेवर थांबत होती. मात्र होम फलाटाच्या कामामुळे लोकल उभी राहण्याची जागा बदलण्यात आली होती. शुक्रवारपासून पुन्हा जुन्याच जागेवर लोकल थांबवली जाणार आहे. मात्र शुक्रवारी या लोकलच्या बदललेल्या जागेमुळे प्रवाशांची तारांबळ उडाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबतची घोषणा रेल्वे स्थानकावर केली जात असली तरी अनेक प्रवाशांना या निर्णयाची माहिती नव्हती. त्यामुळे महिला, पुरूष प्रवाशांची एकच तारांबळ पाहायला मिळाली. प्रथम दर्जा, द्वितीय दर्जा या डब्ब्यांची जागाही बदलल्याने अनेकांचा गोंधळ उडाला. त्यामुळे जुना फलाट क्रमांक एक बदलल्याने संतापलेल्या प्रवाशांच्या संतापात आणखी भर पडली.