एमएमआरडीएकडे काँग्रेसची मागणी

ठाणे : मुंबई आणि ठाणे या शहरांच्या वेशीवरील नवीन कोपरी पुलाला तडा गेल्याने त्याचे उद्घाटन लांबणीवर पडले आहे. परंतु टाळेबंदी शिथिलीकरणानंतर जुन्या कोपरी पुलावर पुन्हा वाहतूक कोंडी होऊ लागली असून त्याचा फटका रुग्णवाहिकांनाही बसत आहे. त्यामुळे नवीन कोपरी पुलावरून केवळ रुग्णवाहिकांना वाहतुकीची मुभा देण्याची मागणी काँग्रेसने एमएमआरडीएकडे केली आहे.

मुंबई आणि ठाणे या शहरांना जोडणाऱ्या नव्या कोपरी पुलाचे काम पूर्ण झाल्याने येथील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्याची चिन्हे निर्माण झाली होती. या पुलाला तडे गेल्याची बाब निदर्शनास आल्यामुळे या पुलाचे उद्घाटन लांबणीवर पडले असून यामुळे जुन्याच अरुंद पुलावरून वाहनांची वाहतूक सुरू आहे. टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर वाहनांचा भार वाढून कोपरी पुलाजवळ पुन्हा वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. या कोंडीचा फटका रुग्णावाहिकांना बसत आहे. रुग्णवाहिका कोंडीत अडकून पडत असून या कोंडीमुळे रुग्ण दगावण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे नव्याने बांधलेल्या कोपरी पुलाचे उद्घाटन होत नाही, तोपर्यंत या पुलावरून केवळ रुग्णवाहिकांना वाहतुकीसाठी मुभा द्यावी. तसेच रुग्णवाहिकेसाठी पुलावर ग्रीन कॉरिडॉर (विशेष मार्गिका) मार्गिका करावी, अशी मागणी काँग्रेसचे ओबीसी विभागाचे ठाणे जिल्हाध्यक्ष राहुल पिंगळे यांनी एमएमआरडीएकडे केली आहे. अशी मार्गिका केल्यास रुग्णवाहिका वेळेत रुग्णालयात पोहचू शकतील , असा दावाही त्यांनी केला आहे.