भुयारी मार्ग अडचणीचा ठरण्याची भीती, अविरत वाहतुकीसाठी प्राधान्य

अंबरनाथ : कर्जत, बदलापूर, अंबरनाथ या शहरांना मुंबई, नवी मुंबई, ठाणे या शहरांशी जोडण्यासाठी आवश्यक असलेल्या काटई-कर्जत राज्यमार्गातील नेवाळी चौकात उड्डाणपूलच योग्य ठरणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मुंबईतील भुयारी मार्गाची पावसाळ्यातील अवस्था आणि इतिहास पाहता नेवाळी चौकात भुयारी मार्ग अव्यवहार्य ठरण्याचा एमएमआरडीए प्रशासनाचा कयास आहे. त्यामुळे मेट्रो मार्गाला कोणाताही धक्का न लावता नेवाळी चौकात उड्डाणपूल उभारण्यात येणार असल्याची माहिती खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. नेवाळी चौकात उड्डाणपूल झाल्यास या मार्गावरील वाहतूक विनाथांबा होण्यास मदत होणार आहे.

गेल्या काही वर्षांत ठाणेपल्याड कल्याण आणि त्या शेजारील २७ गावे, अंबरनाथ, बदलापूर, तळोजा-खोणी मार्गावर मोठय़ा प्रमाणावर नागरिकीकरण झाले आहे. त्यामुळे कधी नव्हे ते या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ पाहायला मिळते. करोनाच्या काळात रेल्वेची लोकलसेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद असल्याने रस्ते मार्गानेच सार्वजनिक आणि खासगी वाहनाने चाकरमान्यांना कार्यालय आणि इच्छित स्थळ गाठावे लागत आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून काटई-कर्जत मार्गावर वाहतूक मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. त्यात नेवाळी चौक गेल्या काही वर्षांत प्रचंड वर्दळीचा बनला आहे.

चौकाच्या चारही बाजूंना दुकाने, खाद्यपदार्थ विक्रेते असल्याने चौकाचा मोठा भाग व्यापला जातो आहे. कल्याणहून मलंगगड, नेवाळी गावाकडे आणि तिकडून कल्याणकडे जाणारी वाहतूकही मोठी असल्याने अनेकदा या चौकात काटई बदलापूर हा मार्ग रोखून ठेवावा लागतो. त्यामुळे काटई-कर्जत मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. मुंबईहून आलेल्या आणि मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना इथे मोठा काळ ताटकळत थांबावे लागते. त्यामुळे या चौकात होणारी कोंडी फोडण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होती. एमएमआरडीए प्रशासनाने २०१९ साली काही लोकप्रतिनिधींच्या मागणीवरून येथे भुयारी मार्ग प्रस्तावित केला होता. मात्र मुंबईतील भुयारी मार्गाचा इतिहास आणि पावसाळ्यातील मार्ग तुंबण्याच्या घटनांमुळे नेवाळी चौकाची कोंडी फोडण्यासाठी उड्डाणपूलच योग्य पर्याय ठरेल, असे स्थानिक खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. खा. शिंदे यांनी एमएमआरडीए आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांची नुकतीच भेट घेत या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याची मागणी केली होती. उड्डाणपूल उभारणीचे महत्त्वही यावेळी स्पष्ट करण्यात आले. मेट्रो मार्गाला धक्का लागेल असे सांगत काही लोकप्रतिनिधी यांनी भुयारी मार्गाचा अव्यवहार्य पर्याय सुचवला होता. मात्र मुंबई आणि नागपूर शहरात मेट्रो आणि उड्डाणपूल एकाच ठिकाणी आहेत. त्याच धर्तीवर नेवाळी चौकातही उड्डाणपूल उभारण्याचा एमएमआरडीएचा मानस असल्याचे एमएमआरडीएने स्पष्ट केल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले आहे. पावसाळ्यात भुयारी मार्ग तुंबण्याचे प्रकार अधिक होत असतात. भुयारी मार्गाचा अव्यवहार्य पर्याय टाळत उड्डाणपुलाच्या पर्यायावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

कोणताही अभ्यास न करता काही लोकप्रतिनिधींनी नेवाळी चौकात भुयारी मार्गाची मागणी केली होती. ती मागणी पुरताच मर्यादित राहिली. त्यांना त्यांच्या शहरातल्या भुयारी मार्गाची सद्यस्थिती माहिती नाही. तीच परिस्थिती नेवाळी चौकात होऊ नये यासाठी उड्डाणपूल उभारण्याची आमची मागणी आहे.

– डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार, कल्याण