scorecardresearch

अंबरनाथ-बदलापूर महापालिका निर्मितीला वेग? मुख्यमंत्र्यांकडून स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा

अंबरनाथ आणि बदलापूर ही उपनगरे झपाटय़ाने वाढत आहेत.

ambernath nager parishad
(संग्रहित छायचित्र)

अंबरनाथ आणि बदलापूर या दोन नगरपालिकांची महापालिका करण्याच्या हालचालींना पुन्हा वेग आला असून दोन दिवसांपूर्वी अंबरनाथच्या दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याविषयी स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचे वृत्त आहे.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे असताना यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले होते. स्थानिक पातळीवर भाजप आणि शिवसेनेत या मुद्दय़ावर मतभेद असल्याने पुढे हा विषय मागे पडला. आता शिंदे हा विषय मार्गी लावण्यासाठी इच्छुक असल्याने दोन्ही शहरांच्या एकत्रित महापालिकेच्या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला आहे.अंबरनाथ येथील शिव मंदिर आर्ट फेस्टिव्हलच्या निमित्ताने शिंदे अंबरनाथ येथे आले होते. या मुद्दय़ावर अंबरनाथ आणि बदलापूर येथील त्यांच्या निकटवर्तीयांशी चर्चा केल्याचे समजते.

भाजपचाही हिरवा कंदील?
अंबरनाथ आणि बदलापूर ही उपनगरे झपाटय़ाने वाढत आहेत. जवाहरलाल नेहरू न्यास ते बडोदा राष्ट्रीय महामार्गामुळे बदलापूर शहराचे महत्व वाढते आहे. तर एमएमआरडीच्या प्रादेशिक आराखडय़ानुसार अंबरनाथ – तळोजा प्रस्ताविद बोगदा, काटई – खोणी रस्ता, मेट्रो १२ आणि १४ या प्रकल्पांमुळे अंबरनाथ शहराचे महत्त्व वाढणार आहे. बहुउद्देशीय वाहतूक मार्गिकेमुळे वसई विरार, भिवंडी, कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, कुळगाव बदलापूर, नवी मुंबई नैना, विमानतळ आणि खोपट हा भाग जोडला जाणार आहे. योग्य वेळी पायाभूत सुविधांचा विकास केल्यास नागरी विस्तारीकरणासाठी संधी मिळून नियोजबद्ध विकास होईल असा दावा एमएमआरडीएचा आहे. त्यासाठी प्रादेशिक आराखडय़ात दोन्ही नगरपालिकांची एकत्रित महापालिका करण्याचा प्रस्ताव एमएमआरडीएने ठेवला होता. त्या वेळी राज्यात भाजप-शिवसेनेची एकत्रित सत्ता असली तरी दोन्ही पक्षांतील विसंवाद होता. दोन्ही शहरांची एकत्रित महापालिका करण्याऐवजी बदलापूर शहराची स्वतंत्र्य महापालिका करावी असा सूर तेव्हा स्थानिक भाजप नेत्यांनी लावला होता. आता पुन्हा नगरपालिका निवडणुका घेण्याऐवजी थेट महापालिका घोषित करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती आहे.

अनुकूल वातावरण
कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे क्षेत्रफळ ३५.८५ चौरस किलोमीटर असून २०११ च्या जनगणनेनुसार १ लाख ७४ हजार लोकसंख्या होती. ती सध्या साडेतीन लाखांच्या पुढे तर ३६.६३ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या अंबरनाथची २०११ ची २ लाख ५३ हजार इतकी असलेली लोकसंख्या आता चार लाखांवर गेली आहे. तत्कालीन कोकण विभागीय आयुक्त तानाजी सत्रे यांनी महापालिकेच्या दृष्टीने या दोन्ही शहरांचा, त्यांच्या वेशीवर असलेल्या वाढणाऱ्या गावांचा पाहणी दौरा केला होता. त्या वेळी एकत्रित महापालिका केल्यास त्यासाठी आवश्यक क्षेत्रफळ, उत्पन्नाची साधने, लोकसंख्या अशा बाबी तपासल्या होता.

असा आहे प्रस्ताव..
प्रस्तावित विस्तारीकरणात कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील म्हारळ, वरप, राहटोली, साई, सापे आणि चामटोली या गावांचा यात समावेश करण्यात आला आहे. अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकेच्या एकत्रित ७४.०५ चौ.की.मी. क्षेत्रफळात १९.६६ चौ.की.मी. क्षेत्रफळ मिळवून ९३.७१ चौ.की.मी. क्षेत्रफळ असलेली महापालिका निर्माण करण्याचे एमएमआरडीएने प्रस्तावित केले आहे.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2023 at 03:23 IST

संबंधित बातम्या