अंबरनाथः अंबरनाथ पश्चिमेतील खाटूश्याम गणेशोत्सव मंडळाच्या गणरायासमोरील मोदकाचा लिलाव यंदा तब्बल १ लाख ८५ हजार रुपयांना झाला आहे. ही मानाची बोली कल्याणचे भाविक अनामिक त्रिपाठी यांनी लावून जिंकली. गेल्या तीन वर्षांपासून हा मोदक मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या त्रिपाठी यांना यंदा अखेर समाधान लाभले असून, त्यांच्या बोलीने संपूर्ण मंडपात उत्साहाचे वातावरण रंगले.

कल्याण-बदलापूर महामार्गालगतच्या बुवापाडा परिसरात असलेले खाटूश्याम गणेशोत्सव मंडळ अंबरनाथमधील एक प्रतिष्ठित मंडळ मानले जाते. येथे सन २०११ पासून मोदक लिलावाची परंपरा सुरू झाली. दरवर्षी विसर्जनाच्या पूर्वसंध्येला हा सोहळा उत्साहात पार पडतो. भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित राहून बाप्पाच्या मोदकावर बोली लावतात. हा मोदक श्रद्धा, विश्वास आणि भक्तीचे प्रतीक मानला जातो.

लिलावाची सुरुवात आणि चुरस

नुकतीच विसर्जनाच्या आधी मंडळाचे अध्यक्ष प्रमोदकुमार चौबे यांनी पारंपरिक पद्धतीने मोदक लिलावाची सुरुवात केली. पहिली बोली एका भाविकाने ७९ हजार रुपयांची लावली. त्यानंतर हळूहळू रक्कम वाढत गेली आणि रंगलेल्या स्पर्धेत कल्याणचे अनामिक त्रिपाठी यांनी थेट १ लाख ८५ हजार रुपयांची बोली लावून इतरांना मागे टाकले. मागील तीन वर्षांपासून आम्ही प्रयत्न करत होतो, पण यंदा अखेर हे भाग्य लाभले. हा मोदक केवळ प्रसाद नाही, तर बाप्पाच्या कृपेचे प्रतीक आहे, अशी प्रतिक्रिया मोदक आपल्या घरी नेणाऱ्या त्रिपाठी यांनी दिली.

https://www.facebook.com/share/v/14JdYwSTAQx

मागील वर्षांच्या बोलींचा इतिहास

गेल्या वर्षात, २०२४ मध्ये स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या पत्नी शिल्पा किणीकर यांनी तब्बल २ लाख २० हजारांची विक्रमी बोली लावून मोदक आपल्या घरी नेला होता. त्यामुळे यावर्षीच्या लिलावाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. जरी विक्रमी बोली झाली नसली तरी भाविकांच्या सहभागामुळेवातावरण चैतन्यमय झाले.

भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक उपक्रम

मोदकाच्या लिलावातून मिळणारा निधी मंडळ विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांसाठी वापरत असते. शैक्षणिक मदत, वैद्यकीय शिबिरे, गरीब विद्यार्थ्यांना सहाय्य, तसेच स्थानिक धार्मिक कार्यक्रम या निधीतून राबवले जातात. त्यामुळे मोदक खरेदी ही केवळ बोलीची स्पर्धा नसून सामाजिक जबाबदारीची जोडलेली परंपरा आहे. लिलावाच्या वेळी ढोल-ताशांचा गजर, “गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात संपूर्ण मंडप दणाणून गेला. बोली वाढताच उपस्थित भाविक टाळ्या वाजवत आनंद व्यक्त करत होते. शेवटी मोदक त्रिपाठी यांच्या नावावर झाल्यावर त्यांचे अभिनंदन करण्यात आले.