scorecardresearch

अंबरनाथच्या शिवमंदिर परिसराचे रूप पालटणार, भारतीय पुरातत्व खात्याच्या परवानगीनंतर सुशोभीकरणाचा मार्ग मोकळा

अंबरनाथचा प्राचीन वारसा आणि स्थापत्य कलेचा उत्तम नमुना असलेल्या शिवमंदिराच्या परिसराचे रूप लवकरच पालटणार आहे.

Ambernath Shiv temple
अंबरनाथच्या शिवमंदिर परिसराचे रूप पालटणार (image – loksatta team)

अंबरनाथचा प्राचीन वारसा आणि स्थापत्य कलेचा उत्तम नमुना असलेल्या शिवमंदिराच्या परिसराचे रूप लवकरच पालटणार आहे. त्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेने सादर केलेल्या आराखड्याला नुकतीच पुरातत्व खात्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे परिसराचे सुशोभीकरण शक्य होणार आहे. एकूण १३८ कोटींच्या या आराखड्यातील १२५ कोटींची कामे लवकरच सुरू केली जाणार आहेत. यात वालधुनी नदी किनारी घाट, जलकुंड सुशोभीकरण, भक्त निवास, ऍम्पी थिएटर अशी अनेक कामे केली जाणार असल्याने या परिसराला नवी झळाळी मिळणार आहे.

मुंबई महानगर प्रदेशात शिलाहार काळात उभारण्यात आलेले आणि अजूनही सुस्थितीत असलेले एकमेव शिव मंदिर अंबरनाथ शहरात आहे. स्थापत्य वास्तूकलेचा एक उत्तम नमुना या मंदिराच्या रुपाने पाहता येतो. धार्मिकदृष्ट्या या मंदिराला मोठे महत्व आहे. वालधुनी नदीच्या किनारी असलेल्या या मंदिराचे आणि परिसराचे रूप पालटण्यासाठी स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे गेल्या काही वर्षांपासून प्रयत्नशील आहेत. त्यांनी येथे शिव मंदिर आर्ट फेस्टिवलचेही आयोजन केले आहे. याचाच एक भाग म्हणून शिवमंदिराच्या परिसराचे सुशोभिकरण करण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेच्या माध्यमातून एक आराखडा तयार करण्यात आला होता. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यासाठीचा निधी राज्य सरकारकडून उपलब्ध करून दिला होता. मात्र या कामासाठी भारतीय पुरातत्व खात्याची पूर्वपरवानगी आवश्यक होती.

हेही वाचा – रेल्वे फाटक उघडण्यासाठी भिवंडी जवळील ज्युचंद्र रेल्वे फाटकात प्रवाशांचा गोंधळ

अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने खात्याशी तसा पत्रव्यवहारही करण्यात आला होता. मात्र अनेक महिने यावर निर्णय होऊ शकला नव्हता. अखेर भारतीय पुरातत्व खात्याच्या वतीने नुकतीच शिव मंदिर परिसरातील १०० मीटर अंतरावरील सुशोभीकरण आणि दुरुस्तीच्या कामाला परवानगी देण्यात आल्याची माहिती अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी दिली आहे. या परवानगीमुळे आराखड्यातील कामांच्या निविदा प्रक्रिया राबवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पहिल्या टप्प्यात १२५ कोटींच्या कामांना गती मिळणार असल्याने शिवमंदिर सुशोभीकरण प्रकल्प मार्गी लागणार आहे.

हेही वाचा – कळवा-मुंब्य्रात राजकीय बॅनरबाजी, राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे

ही कामे केली जाणार

शिव मंदिर ज्या वालधुनी नदीच्या किनारी वसले आहे त्या नदीचा काठ घाट स्वरुपात विकसित केला जाणार आहे. त्यासाठी ४० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. सोबतच भक्तनिवासाचीही उभारणी केली जाणार आहे. त्यासाठी साडेचौदा कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. सहा कोटी रुपयांच्या खर्चातून ऍम्पी थिएटर, सोबतच प्रदर्शन गृह, कुंडांचे सुशोभीकरणही केले जाणार आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 17:46 IST