scorecardresearch

कळवा-मुंब्य्रात राजकीय बॅनरबाजी, राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे

दोन्ही फलक जागरूक नागरिकांच्या नावाने लावण्यात आलेले असले तरी त्यामागे राष्ट्रवादी आणि बाळासाहेबांची शिवसेनेचा हात असल्याचे बोलले जात असून, या बॅनरबाजीमुळे राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.

Political banners Kalwa Mumbara
कळवा-मुंब्य्रात राजकीय बॅनरबाजी (लोकसत्ता ग्राफिक्स)

‘स्वत:ला विकू नका’, असे आवाहन राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असलेल्या माजी नगरसेवकांना करणारे फलक कळवा-मुंब्रा परिसरात लावण्यात आलेले असतानाच, त्यापाठोपाठ या फलकांना प्रत्युत्तर देणारे फलक कळवा-मुंब्रा परिसरात लावण्यात आले आहेत. लबाड बोका ढोंग करतोय, नगरसेवकांनीही समजून घ्या आता माणूस किती आहे हा खोटा, असा संदेश फलकांवर प्रसारित करत त्यातून अप्रत्यक्षपणे आमदार जितेंद्र आव्हाड यांना लक्ष्य करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. हे दोन्ही फलक जागरूक नागरिकांच्या नावाने लावण्यात आलेले असले तरी त्यामागे राष्ट्रवादी आणि बाळासाहेबांची शिवसेनेचा हात असल्याचे बोलले जात असून, या बॅनरबाजीमुळे राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा-मुंब्रा या परिसरातून राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येतात. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे सुद्धा याच भागातून निवडून येतात. त्यामुळे हा परिसर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. राज्यातील सत्ताबदलानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार जितेंद्र आव्हाड हे एकमेकांवर कुरघोडी करताना दिसत आहेत. यातूनच आव्हाड यांना शह देण्यासाठी कळवा आणि मुंब्रा परिसरातील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांना गळाला लावून पक्षात घेण्याचे प्रयत्न बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून सुरू असल्याचे बोलले जात आहे. याच मुद्द्यावरून आव्हाड यांनी समाजमाध्यमांवरून एक प्रतिक्रीया व्यक्त करत पैशांचे आमिष दाखवून राष्ट्रवादी फोडण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. या आरोपांमुळे खळबळ ‌उडाली असतानाच कळवा आणि मुंब्रा परिसरात शनिवारी ‘खोका – बोका’ असा संदेश असलेले फलक एक जागरूक नागरिक रविंद्र पोखरकर यांच्या नावाने लागले.

हेही वाचा – ठाणे : बँकेचा कर्मचारी बोलत असल्याचे सांगून तरुणाची लाखो रुपयांची फसवणूक

नगरसेवकांनो स्वतःला विकू नका. महाराष्ट्राच्या राजकारणात खोका नावाची किड महाराष्ट्राचे राजकीय संस्कार उद्ध्वस्त करून गेली. ही किड आता कळवा-मुंब्य्रात आली आहे. नगरसेवकांनो आता त्याच्यापासून लांब रहा. कळवा-मुंब्य्रातील जनता तुमची गद्दारी कधीच माफ करणार नाही. २००९ नंतर कळवा-मुंब्य्रात झालेला बदल आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. गद्दारी जनता माफ करणार नाही, असे आवाहन नगरसेवकांना या फलकाद्वारे करण्यात आले होते. पोखरकर यांच्या नावाने हे फलक लागले असले तरी त्यामागे आव्हाड गटाचा हात असल्याची चर्चा सुरू होती. या फलकांमुळे राजकीय तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पालिका आणि पोलिसांकडून हे फलक काढून टाकण्यात आल्याचे सुत्रांकडून समजते. त्यापाठोपाठ आता लबाड बोका ढाँग करतोय,अशा संदेशांचे फलक नरेश शिंदे यांच्या नावाने लागले आहेत.

हेही वाचा – भिवंडी : खड्ड्यात दुचाकी गेल्याने अपघात, दोनजण जखमी

करून करून भागले, प्रवचन लागले, नगरसेवक तुमचे तुमच्या हातून चालले. पायाखाली बघा तुमच्या दुसऱ्याकडे कशाला बोट? नगरसेवक सोडून जातात तर असेल ना तुमच्यातच खोट, विश्वास नाही उरला तुमचा तुमच्याच नगरसेवकांवर आता ? आधी गळ्यात गळे आणि आता एकदम मारताय लाथा, मुंबा, कळव्याच्या विकासाचे फुकट लाटता श्रेय, आयत्या पिठावर रेघोट्या हेच तुमचे ध्येय. जनता आता समजून चुकली कोण खरे, कोण खोटे. नगरसेवकांनीही समजून घ्या आता माणूस किती आहे हा खोटा. तेल गेलं तूप गेलं राहणार नाही, असा संदेश फलकांवर प्रसारित करण्यात आला असून त्यामाध्यमातून अप्रत्यक्षपणे आमदार जितेंद्र आव्हाड यांना लक्ष्य करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. हे दोन्ही फलक जागरूक नागरिकांच्या नावाने लावण्यात आलेले असले तरी त्यामागे राष्ट्रवादी आणि बाळासाहेबांची शिवसेनेचा हात असल्याचे बोलले जात असून यामुळे दोन्ही गटात बॅनरयुद्ध रंगल्याचे चित्र आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 16:25 IST