ठाणे : घोडबंदर, ठाणे येथील दळण-वळणासाठी महत्त्वाच्या वडाळा-घाटकोपर-कासारवडवली (मेट्रो चार) मेट्रो प्रकल्पातील कापूरबावडी मेट्रो स्थानकाच्या निर्माणातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) एका रात्रीत यु आकाराचे आठ गर्डर यशस्वीरित्या बसविले आहेत. कापूरबावडी मेट्रो हे स्थानक ठाणे-भिवंडी-कल्याण (मेट्रो पाच) या प्रकल्पाचेही प्रमुख स्थानक असणार आहे.

ठाणे शहरात मेट्रो मार्गिका चार आणि पाच या प्रकल्पाच्या निर्माणाचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी स्थानक उभारले जात होते. परंतु कापूरबावडी या मेट्रो स्थानकाचे काम अतिशय महत्त्वाचे होते. कारण, याच स्थानकातून मेट्रो पाच देखील जोडली जाणार आहे. कापूरबावडी मेट्रो स्थानकाचे काम गेल्याकाही दिवसांपासून सुरू होते. नुकतेच येथे आठ गर्डर उभारण्यात आले. या ⁠प्रति गर्डरचे वजन ९७.९२ मेट्रिक टन इतके होते. तर एकूण वजन ७८३.३६ मेट्रिक टन इतके होते. एका रात्रीत हे गर्डर उभारण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या कार्यासाठी एकूण ९० कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते, ज्यामध्ये २८ रिगर्स, १० कुशल कामगार, २० अकुशल कामगार तसेच ३५ वाहतूक समन्वय अधिकाऱ्यांचा समावेश होता. तसेच विविध प्रकारची यंत्रसामग्री वापरण्यात आली, ज्यामध्ये क्रेन, अवजड वाहने, पुलर्स यासह इतर वाहनांचा सामावेश होता.