सुहास बिऱ्हाडे/मयूर ठाकूर

भाईंदर : सुट्टी न दिल्याने संतप्त झालेल्या महिला कर्मचारीने डी-मार्टमधील सामानाला आग लावल्याची घटना भाईंदर येथे घडली आहे. मेहेक अग्रवाल असे या २३ वर्षीय महिला कर्मचारीचे नाव आहे. या प्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाईंदर पश्चिमेच्या मुख्य डीपी रोडवरील डी मार्टमध्ये मेहेक अग्रवाल ही तरुणी कामाला होती. तिला व्यवस्थापनाकडून सुट्टी नाकारण्यात येत होती. तिच्या सोयीनुसार कामाची वेळदेखील बदलून देण्यात येत नव्हती. त्यामुळे ती मागील काही दिवसांपासून नाराज होती. गुरुवारी तिने पुन्हा सुट्टीसाठी अर्ज केला. मात्र तो मंजूर करण्यात आला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या मेहेकने दुपारी १२ च्या सुमारास रागाच्या भरात डीमार्टमधील कपडे आणि खेळणी ठेवलेल्या भागाला चक्क आग लावली. आग लागल्याने डी मार्टमध्ये एकच घबराट पसरली. यावेळी उपस्थितीत असलेल्या कर्मचाऱ्यांनी अग्निरोधक उपकरणांनी आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र या आगीत जवळपास २० हजारांचा माल जळून खाक झाला.

हेही वाचा – ठाण्यात गृहनिर्माण महासंघातर्फे रोजगाराची संधी उपलब्ध; गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन प्रशिक्षण वर्गांच्या नोंदणीस सुरुवात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही आग मेहेकने लावल्याचे सीसीटीव्हीमधून स्पष्ट झाले. या प्रकरणी स्टोअर व्यवस्थापक विराज लाड यांनी भाईंदर पोलीस ठाण्यात मेहेक विरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून भाईंदर पोलिसांनी हेतुपुरस्सर दुखापत आणि नुकसान करण्याच्या उद्देशाने आग लावल्याने कलम ४३५, ४२७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात डी मार्टचे व्यवस्थापक विराज लाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अधिकृत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

हेही वाचा – कडोंमपाची नागरी सुविधा केंद्रे सुट्टीच्या दिवशी सुरू राहणार

मेहेक ही काही महिन्यांपूर्वी डी मार्टमध्ये कामाला लागली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल असून आम्ही पुढील तपास करत आहोत, अशी माहिती भाईदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुटराव पाटील यांनी दिली आहे.