ठाणे : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर वन परिक्षेत्रात दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी प्राणी आणि पक्ष्यांची गणना केली जाते. परंतु मे महिन्यात सुरु असलेला अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरणामुळे पौर्णिमेच्या रात्री होणाऱ्या प्राणी-पक्षी गणनेत केवळ ६१ प्राणी पक्षी आढळून आले. गेल्यावर्षी गणना केली त्यावेळी याच जंगलात पाच बिबट्यांसह १५२ प्राणी- पक्षी आढळून आले होते.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईचे फुफ्फुस ओळखले जाते. या जंगलामध्ये विविध पक्ष्यांचा, प्राण्यांचा अधिवास आहे. परंतु अवैध बांधकामे, रात्री होणाऱ्या पार्ट्या यामुळे प्राण्यांच्या अधिवासाला धोका पोहचतो. पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र असूनही येथे विवाह सोहळे, मद्य पार्ट्या रंगतात. त्यामुळे येऊरमध्ये पर्यावरणवाद्यांनी अनेक आंदोलने केली. त्यानंतर येथे काहीशा प्रमाणात निर्बंधांचे पालन केले जात होते. परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पुन्हा पार्ट्या सुरू झाल्या आहेत. येऊरच्या जंगलात दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या रात्री प्राणी पक्ष्यांची गणना केली जाते. त्यासाठी जंगलातील पाणवठे, रात्री प्राण्यांची ये-जा असलेल्या ठिकाणी मचाण उभारली जाते. वन विभागाचे कर्मचारी या ठिकाणी बसून प्राणी-पक्ष्यांची गणना करत असतात.

बुद्ध पौर्णिमेच्या सायंकाळी ६ ते मंगळवारी पहाटे ६ या कालावधीत येऊर वन परिक्षेत्रातील येऊर पूर्व, कावेसर, चेणा पूर्व आणि पश्चिम, सारजामोरी, ससुनखघर, नागला, घोडबंदर आणि काशी येथील नैसर्गिक पाणवठ्यांच्या ठिकाणी ही गणना झाली. या गणनेमध्ये केवळ ६१ प्राणी-पक्षी आढळून आले आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत हे प्रमाण अर्धे आहे. गेल्यावर्षी बिबटे, रान कोंबडे, लालतोंडी माकडांसह १५२ प्राणी-पक्षी आढळून आले होते. यावर्षी सांबर, रान डुक्कर, लंगूर, माकड, सर्प गरुड अशा प्राणी-पक्ष्यांच्या प्रजाती आढळल्या.

ढगाळ वातावरणामुळे हवेत गारवा होता. त्यामुळे रात्री पाणवठ्यावर प्राणी- पक्षी आले नाहीत. त्यामुळे प्राणी-पक्ष्यांची गणना कमी झाली. – मयुर सुरवसे, वन परिक्षेत्र अधिकारी, येऊर.

मागील वर्षीची गणना

प्राणी-पक्षी – संख्या

बिबटे- ५

सांबर- १५

रान डुक्कर- ६

लंगूर – २२

रान कोंबडा – ५

लालतोंडी माकड- १५

ससे- ९

वट-वाघुळ- २१

घुबड – ५

मुंगुस- ३

माकड – ४०

साळींदर – ३

धामण- १

रान-मांजर – २

एकूण – १५२

यावर्षीची गणना

प्राणी-पक्षी – संख्या

सांबर – १

रान डुक्कर – ३

लंगूर- १७

रान कोंबडा – १

वट वाघुळ- १९

घुबड – ७

मुंगुस – ३

माकड – ८

रान मांजर – १

सर्प गरुड- १

एकूण – ६१