धातूमिश्रित मांज्यामुळे विजेचा धक्का बसण्याच्या घटना;  मुंब्रा, कळवा, कल्याण परिसरांत पतंग उडवताना खबरदारी घेण्याचे आवाहन
मकरसंक्रांतीचा सण जवळ येऊ लागतो तसतसे पतंग उडवण्याचा ज्वर टिपेला पोहोचत जातो. एकीकडे पतंगांच्या मांज्यांमुळे पक्षी जखमी होण्याच्या घटना घडत असताना अलीकडच्या काळात बाजारात आलेल्या काही विशिष्ट प्रकारच्या मांज्यांमुळे पतंग उडवणाऱ्यांनाही धोका निर्माण झाला आहे. बाजारात सध्या उपलब्ध असलेल्या धातू किंवा काचमिश्रित मांज्यांचा उघडय़ा वीजवाहिन्यांशी संपर्क होताच ‘पतंग’पटूंना शॉक लागण्याच्या घटना उजेडात आल्या आहेत. मुंब्रा, कळवा, कल्याण पूर्व, डोंबिवली तसेच ग्रामीण भागांमध्ये अनेक ठिकाणी उघडय़ा वीजवाहिन्या असल्याने पतंग उडवताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
मकरसंक्रांत आणि पतंग हे समीकरण असून या कालावधीत अनेक जण हौसेने पतंग उडवतात. प्रतिस्पध्र्याचा पतंग कापण्यासाठी धारदार मांज्यांना तरुणांची पसंती असते. त्यामुळे बाजारात धातूमिश्रित तसेच काचमिश्रित मांज्यांची मोठी चलती आहे. मात्र, या मांज्यांवर रसायनाचा थर चढवण्यात येत असल्याने उघडय़ा वीजवाहिन्यांशी त्यांचा संपर्क येताच मांज्यातून वीज प्रवाहित होऊन पतंग उडवणाऱ्याला विजेचा धक्का बसतो, असे उघड झाले आहे.
दोन वर्षांपूर्वी कळवा परिसरात अशाच प्रकारे झालेल्या अपघातात एक तरुण जबर जखमी झाला होता. या पाश्र्वभूमीवर महावितरणने पतंग उडवणाऱ्यांना खबरदारीचा इशारा दिला आहे.
‘‘ठाणे जिल्ह्य़ातील प्रामुख्याने कल्याण पूर्व, डोंबिवली, मुंब्रा, कळवा, दिवा, वागळे इस्टेट तसेच ग्रामीण भागांत महावितरणच्या वीजवाहिन्या उघडय़ावर आहेत. त्यामुळे पतंगाच्या मांज्याशी त्यांचा संपर्क येऊन त्यातून विजेचा धक्का बसण्याचे प्रकार घडू शकतात,’’ असे महावितरणचे भांडुप परिमंडळाचे मुख्य अभियंता सतीश करपे यांनी म्हटले आहे. या संदर्भात महावितरणतर्फे विशेष जनजागृती मोहीमही राबवण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
पतंग उडवताना काळजी घ्या..
* विजेच्या तारांवर अडकलेले पतंग सोडवण्याचा प्रयत्न करू नका.
*वीजतारांमध्ये अडकलेले पतंग काढण्यासाठी दगडाला दोर बांधून तारांवर फेकू नका.
*धातूमिश्रित मांजा घातक ठरू शकतो. सध्या बाजारात धातूमिश्रित मांजा मिळतो या मांज्यावर रसायनांचे कोटिंग असल्याने त्यातून वीज प्रवाहित होऊन अपघात घडतो.
* मांज्यामुळे पक्षी जखमी होणार नाही याची काळजी घ्या.
*  रेल्वे रुळांवर उतरून पतंग उडवणे धोक्याचे ठरू शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रेल्वे रुळांवर अधिक धोका
रेल्वे रुळांवर पतंग उडवण्याच्या नादात झालेल्या अपघातांच्या पाश्र्वभूमीवर रेल्वेनेही पतंगबाजांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. तसेच रेल्वेच्या ओव्हरहेड तारांमधून प्रचंड वीज प्रवाहित होत असते. त्या ठिकाणीही पतंग उडवणाऱ्यांना विजेचा धक्का बसण्याची भीती आहे. या पाश्र्वभूमीवर रेल्वे रुळांच्या परिसरात पतंग उडवताना आढळल्यास कारवाई करण्याचा इशाराही रेल्वे प्रशासनाने दिला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Appeal to take precautions during flying kite
First published on: 12-01-2016 at 07:46 IST