लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : एकाबाजूला सुरू असलेली मेट्रो प्रकल्पाची कामे आणि दुसऱ्या बाजूला वेस ओलांडून रस्त्यावर उभी ठाकलेल्या बेकायदा टपऱ्या यामुळे ठाणे शहराचा केंद्रबिंदू असलेला तीन हात नाका आणि इटरर्निटी मॉलचा परिसर सध्या अभूतपूर्व अशा कोंडीने ग्रासला आहे. ठाण्यातील बड्या राजकीय नेत्यांचा दबदबा असलेला हा संपूर्ण परिसर आहे. असे असताना ठाणे महापालिका प्रशासनाला वाकुल्या दाखवित वाहतुकीस अडथळा ठरू लागलेल्या या टपऱ्यांना आणि बांधकामांना नेमका आशिर्वाद कोणाचा आहे असा सवाल सर्वसामान्य ठाणेकरांना पडला आहे. या अतिक्रमणामुळे अरुंद झालेल्या रस्त्यावरून मार्ग काढत इच्छित ठिकाणी जाऊ पाहणाऱ्या ठाणेकरांना दररोज कोंडीत अडकून पडावे लागत आहे. याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नसल्याचे चित्र आहे.

तीन हात नाका भागात नेत्रदानाविषयी जनजागृती करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा आगाशे (७३) यांचा अपघाती मृत्यू झाला. या अपघातानंतर आता तीन हात नाका चौकातील दुरावस्थेचे विदारक चित्र समोर येत आहे. घोडबंदर, ठाणे शहर, भिवंडी येथून हजारो वाहने तीन हात नाका- इटर्निटी मालॅ- एलबीएस रोड मार्गे मुलुंड, भांडुप, वागळे इस्टेट गाठत असतात. सध्या वडाळा-घाटकोपर-कासारवडवली या मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. मेट्रोच्या खांबामुळे येथील मार्गिका अरुंद झाल्या आहेत. त्यातच इटर्निटी मॉल बाहेरील मुख्य आणि सेवा रस्ता, पदपथ मागील काही वर्षांपासून मोठ्याप्रमाणात बेकायदा टपऱ्यांच्या विळख्यात सापडला आहे.

याठिकाणी लांब पल्ल्याच्या खासगी बसगाड्यांसाठी तिकीट नोंदणी केली जाते. अनेक खासगी टूर्स आणि ट्रॅव्हल कंपन्यांच्या याठिकाणी टपऱ्या आहेत. तसेच पान टपऱ्या, उपाहारगृह, वाहनांच्या चाकांची दुकाने, टपऱ्या देखील याठिकाणी थाटण्यात आल्या आहेत. परिसरातील कंपन्यांतील कर्मचारी, तिकीट नोंदणी करण्यासाठी येणारे नागरिक याठिकाणी रस्त्याचा भाग अडवून त्यांची वाहने उभी करत असतात. याच भागात एक रिक्षा थांबाही उभा राहिला आहे. त्यामुळे हरिनिवास, नौपाडा, पूर्व द्रुतगती महामार्गावरून मुलुंड, भांडूप आणि वागळे इस्टेट येथे कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांचे वाहतुक कोंडीमुळे हाल होता. मुख्य मार्ग असतानाही केवळ दोन ते तीन पदरी मार्गिका वाहन चालकांना याठिकाणी उपलब्ध होते.

बेकायदा टपऱ्यांमुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी पदपथ देखील शिल्लक राहिला नाही. याच परिसरात बेस्ट बसगाड्यांसाठी थांबा आहे. या बसगाड्यांसाठी ठाणे भागात राहणारे नागरिक पायी बसथांब्याच्या दिशेने जातात. त्या प्रवाशांची गर्दी याठिकाणी असते. तसेच कामानिमित्त इटर्निटी परिसरात जाणाऱ्या पादचारी देखील ये-जा करतात. त्यामुळे या भागात एखादा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्चही विचारला जात आहे. विशेष म्हणजे, ठाण्यातील बड्या राजकीय नेत्यांचा दबदबा असलेला हा संपूर्ण परिसर आहे. असे असतानाही या परिसराच्या दुरावस्थेकडे यंत्रणांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे.

एलबीएस मार्गाने वाहतुक करताना इटर्निटी मॉल परिसरातील बेकायदेशीरित्या उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे रस्ता अरूंद झाला आहे. येथे नागरिक विविध कारणांसाठी येत असतात. हा चौक मोठा असल्याने इतर वाहने देखील या मार्गावरून वाहतुक करतात. कोंडी झाल्यास नाहक त्रास सहन करावा लागतो. -जितेंद्र कांबळे, वाहन चालक.

या मार्गावर मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाची कामे सुरू आहेत. असे असतानाही रस्त्याकडेला बेकायदा वाहने उभी राहतात. त्यामुळे मार्गिका अत्यंत अरूंद होते. वाहने चालविताना त्याचा त्रास होतो. याठिकाणी पदपथही बेकायदा टपऱ्यांमुळे गिळंकृत झाले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना त्रास होतो. -योगेश गांगुर्डे, वाहन चालक.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबात कोपरी-नौपाडा प्रभाग समितीचे साहाय्यक आयुक्त सोपान भाईक यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.