कल्याण : कल्याण विभागात वीज देयके भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्राहकांवर महावितरणने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली असून या विभागामध्ये आधीच ३९४ कोटींची थकबाकी असताना त्यात आता नव्याने १३२ कोटींच्या थकबाकीची भर पडल्याची बाब समोर आली आहे. वारंवार आवाहन आणि कारवाईचे इशारे देऊनही ग्राहक थकीत रकमेचा भरणा करीत नसल्यामुळे अशा ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली आहे.
वीज देयकाची थकीत आणि चालू रक्कम वसूल करण्यासाठी तांत्रिक कर्मचाऱ्यांसोबत क्षेत्रीय अभियंते, मंडल, विभागीय अभियंते कारवाई मोहिमेत सहभागी होत आहेत. वीज देयक भरणा करण्याची मुदत संपलेल्या दोन लाख ८६ हजार ३१८ ग्राहकांकडे ७६ कोटी ५४ लाख आणि तात्पुरत्या स्वरूपात वीजपुरवठा खंडित केलेल्या ६६ हजार ६३४ ग्राहकांकडे ५५ कोटी ८२ लाख रुपयांची थकबाकी आहे. उष्णतेमुळे रहिवासी हैराण असल्याने रहिवाशांच्या घराचा वीजपुरवठा खंडित करण्याची महावितरणची इच्छा नाही. मात्र, देयक भरणा करण्यात येत नसेल तर नाइलाजाने अशी कारवाई करणे भाग पडते. ही कारवाई टाळण्यासाठी ग्राहकांनी तात्काळ चालू, थकीत देयकाचा वीज भरणा करावा, असे आवाहन कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी केले आहे.
अभय योजना..
कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांना थकबाकीत सवलत, व्याज, विलंब आकार, माफी आणि पुनजरेडणीची संधी देण्यासाठी शासनाची विलासराव देशमुख अभय योजना आहे. या योजनेचा आतापर्यंत ८,४०५ ग्राहकांनी लाभ घेतला आहे. त्यांच्याकडून पाच कोटी ३२ लाख रुपयांचा भरणा महावितरण तिजोरीत झाला आहे. या योजनेत मूळ थकबाकीची रक्कम एकरकमी भरणा केल्यास व्याज व विलंब आकाराची रक्कम पूर्ण माफ केली जाते. मूळ थकबाकीवर लघुदाब ग्राहकांना दोन कोटी ९५ लाख रुपयांची अतिरिक्त सवलत देण्यात येते, अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली. ठाणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग आणि पालघर जिल्ह्यात २२ हजार ३५२ कृषिपंप वीज ग्राहक आहेत. त्यांनी थकबाकी धोरणाचा लाभ घेऊन १७ कोटींचा भरणा महावितरणकडे केला आहे. ठाणे, पालघर जिल्ह्यातील १३ हजार कृषिपंप ग्राहकांनी नऊ कोटींचा भरणा केला आहे, अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.
३९४ कोटींची थकबाकी
कल्याण परिमंडलातील तीन लाख दोनशे लघुदाब आणि उच्चदाब वीज ग्राहकांकडे ३९४ कोटींची थकबाकी आहे. त्यामध्ये ३९ कोटी ११ लाख थकीत रकमेवरील व्याज, विलंब आकाराचा समावेश आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही थकबाकी असून काही ग्राहकांची घरे बंद आहेत, तर काही मालमत्तांचा शोध लागत नाही आहे. ही थकबाकी असतानाच आता नव्याने १३२ कोटींच्या थकबाकीची भर पडली आहे. त्यामुळे थकबाकी वसुलीचे आव्हान महावितरणपुढे असल्याचे चित्र आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arrears welfare department msedcl initiates action power supply to arrears electricity bills msedcl amy
First published on: 16-04-2022 at 00:39 IST