thlogo03या वसुंधरेच्या पोटातून लाखो जीव जन्माला आले. अगदी सुरुवातीला अगदी एकपेशीय जीव जन्मला. तो वाहावत बहुपेशीय जिवापर्यंत आला. त्याला उत्क्रांतीची जोड मिळाली. या उत्क्रांतिप्रवासामुळे इतक्या विविध प्रकारचे जीव जन्माला आले की त्याचे आकलन होणे कठीण झाले. निसर्ग विविधतेने बहरला. त्याला अनेक फांद्या फुटल्या. त्याची एक फांदी मासे होऊन अफाट समुद्रात पोचली. दुसरी फांदी हिरवा रंग घेऊन वृक्षवेलींमध्ये बहरली. एक फांदी तर विलक्षणच, रंगीबेरंगी पक्ष्यांच्या रूपाने हवेत संचार करणारी, चिवचिवाटाने आकाश भरून टाकणारी.
रंगेबेरंगी या शब्दाचा अर्थ आपल्याला पक्ष्यांनीच शिकवला. प्रत्येक पक्षी रंगरूपाने वेगळा असतोच, पण अनेकदा एका पक्ष्यातही विविध रंग आढळून येतात. एका पक्ष्यात रंगांची किती विविधता असू शकते हे शॉव्हेलर पक्ष्याला पाहून कळते. त्याचे रंग चमकदार तर आहेतच, पण परस्परविरोधीही आहेत. प्रथम डोळ्यात भरते ती त्याची पांढरीशुभ्र छाती. चमकदार हिरव्या मानेवर आणि गळ्यावर तितकेच ब्राइट हिरवे डोके. तसेच त्यामध्ये ढळढळीत उठून दिसणारा पिवळा डोळा. खूप ऊन पडलेले असताना हे हिरवे डोके जांभळट काळे दिसते. कधी डोके पाठीत खुपसून बसलेला शॉव्हेलर कापसाच्या गोळ्यासारखा दिसतो.
पाण्याला स्पर्श करणारा त्याच्या शरीराचा भाग बरोबर मध्यात तपकिरी आणि चेसनट रंगाच्या मिश्रणाचा असतो आणि दोन्ही बाजूला असलेल्या पांढऱ्या रंगात  सँडविच झालेले असते. हिरव्या डोक्यासारखीच चमक शेपटीच्या खाली असते, पण ते शॉव्हेलरच्या पाण्यात पडलेल्या प्रतिबिंबात खास उठून दिसते. फारशी उछलकुद न करता पाण्याच्या काठाकाठाने कधी स्वत:ची मान पाण्याच्या पृष्ठभागावर ताणून धरून चोच पुढे काढून, चोचीचा खालचा भाग पाण्यात ठेवून पोहत राहतो. मध्येच कधीतरी बाहेर येऊन पाण्यात भिजलेली स्वत:ची पिसं साफ करण्याच्या नादात पंख वर उचलतो तेव्हाचा क्षण टिपला तर त्याच्या पाठीवरचा निळ्या रंगाचा पट्टा क्षणार्धात डोळ्यासमोर लकाकून जातो. अशी रंगांची उधळण पाहण्यासाठी सातत्याने खास तपश्चर्या करावी लागते.  अशा रंगीबेरंगी पक्ष्यांची मादी अगदी सुमार मातकट रंगाची असते. इतर पक्ष्यांच्या माद्यांमध्ये सहज मिसळून जाणारी, पण गवंडय़ांच्या थापीसारख्या पसरट, रुंद चोचीमुळे स्वत:चे वेगळेपण दाखवून देणारी असते. त्यांच्या या थापीसारख्या चोचीमुळेच त्यांना शॉल्व्हर किंवा थापटय़ा म्हणतात. जेव्हा थापटय़ाचा नर इकडून तिकडे जायला निघतो, तेव्हा त्याच्या पाठीमागे पाण्याच्या दोन तवंगरेषा उमटतात.  
युरोपमधून स्थलांतर करून येणाऱ्या या थापटय़ाला महाराष्ट्र आवडत असावा. कारण एप्रिलमध्ये इतर पक्षी आपापल्या घरी परत गेले, तरी तो इथे रेंगाळत राहतो. तसेच परतीच्या वेळी अधिकच देखणा दिसतो. पक्षीप्रेमी त्याला अधिक काळ पाहू शकतात. असे सर्वच स्थलांतरित पक्ष्यांच्या बाबतीत होईल, तर किती मजा येईल.
मेधा कारखानीस