ठाण्यातील सिडको बस स्थानक परिसर सकाळी नोकरदार मंडळी आणि विद्यार्थ्यांनी कायम गजबजलेला असतो. धावपळीमुळे अनेकांना घरातून न्याहरी करणे जमत नाही. त्यांच्यासाठी गणेश भुवन हा आवडीचा खाऊकट्टा आहे.
१९८५ मध्ये प्रकाश नायक यांनी हे न्याहरी केंद्र सुरू केले. तत्पूर्वी सदानंद महाले यांच्यासोबत १९७२ पासून तलावपाळीजवळ तांबे उपाहारगृह चालविण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी होता. त्यामुळे अल्पावधीतच जवळच असलेल्या जोशी-बेडेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा हा खाऊकट्टा झाला. दररोज सकाळी कामावर जाणारी मंडळी आणि लेक्चरसाठी जाणारे विद्यार्थी गणेश भुवनमधील कांदेपोहे, उपमा खाण्यासाठी आवर्जून गर्दी करतात. न्याहारीसाठी येणाऱ्या खवय्यांकडून अवघ्या दोन तासांत कांदेपोहे, उपमा यांचा फडशा पडतो. इतर पदार्थामध्ये दररोज विविध चाळीस नाश्त्याचे पदार्थ येथे उपलब्ध असतात.
साधा डोसा, मसाला डोसा, म्हैसूर साधा डोसा, म्हैसूर मसाला डोसा, रवा डोसा, उत्तपा, कांदा उत्तपा, टॉमेटो उत्तपा यांसारखे डोसा, उत्तपाचे प्रकार तसेच समोसा, वडा, कचोरी, भजी, मिसळ, वडा उसळ यांसारखे नाश्त्याचे पदार्थ येथे दररोज बनवले जातात. तसे हे पदार्थ तर सर्रास सगळीकडे मिळतात, पण येथे या पदार्थासोबत मिळणाऱ्या ओल्या खोबऱ्याच्या चटणीची चव खवय्यांच्या जिभेवर रेंगाळत राहते. ओले खोबरे, मिरची आणि उपवास असेल त्या दिवशी शेंगदाणे एवढय़ा पदार्थापासून तयार करण्यात येणारी ही खास चटणी खाण्यासाठी लोक गणेश भुवन येथे येतात. उपवासाच्या दिवशी शेंगदाणे उसळ, राजगिरा पुरीभाजी, बटाटय़ाचा कासऱ्या असे उपवासाचे पदार्थ असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रुचकर भजी, पौष्टिक समोसा
भजी आणि त्याच्या जोडीला आंबटगोड चटणी हा कधीही खवय्यांचा आवडीचा खाद्यपदार्थ. मात्र नेहमीची कांद्याची किंवा बटाटा भजी खाऊन कंटाळा आला असेल, तर गणेश भुवनची मसाला भजी खायला हरकत नाही. कांदा, बेसन पीठ आणि सोबत पौष्टिक भाज्या यांचे मिश्रण असलेली खुसखुशीत मसाला भजी अतिशय चविष्ट आहे. समोसा म्हटला की त्यात बटाटा आणि वाटाणे यांचे मिश्रण असते. मात्र पूर्वी शाळेत मिळणाऱ्या समोशामध्ये विविध प्रकारच्या पौष्टिक भाज्यांचा समावेश असायचा. तसा पौष्टिक समोसा येथे खाण्यास उपलब्ध आहे. बटाटय़ासोबत गाजर, बीट, कांदा, वाटाणे आणि पोहे यांचे मिश्रण असलेला हा व्हेज पट्टी समोसा तसेच बटाटा, खोबरे, काजू-किसमिस यांचे मिश्रण असलेली फराळी कचोरी खवय्ये आवडीने खातात.
या सर्व पदार्थासोबत लस्सी, पीयूष, ताक ही पोटाला थंड ठेवणारी शीतपेये येथे बनवली जातात. गणेश भुवनचे वैशिष्टय़ सांगायचे झाले, तर महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा भेटण्याचा हा अड्डा ठरला आहे. प्रकाश नायक यांच्याकडे जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या माजी विदय़ार्थ्यांची मुलेही येतात आणि आईबाबांनी सांगितलेल्या गणेश भुवनच्या पदार्थाच्या आठवणी उलगडतात. या परिसरात पूर्वी राहणारे लोक या परिसरात कधी आले, की गणेश भुवनला भेट दिल्याशिवाय जात नाहीत. खाद्यपदार्र्थाना असलेली पूर्वीची चवच कायम आहे, अशी प्रतिक्रियाही दिलखुलास देतात, असे गणेश भुवनचे मालक प्रकाश नायक यांनी सांगितले.

कुठे – गणेश भुवन, केशव अपार्टमेंट, ठाणा कॉलेज रोड, चेंदणी कोळीवाडा, ठाणे (प.)
वेळ – स. ८ ते रात्री ८

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article of kinnari jadav breakfasts center
First published on: 10-10-2015 at 01:07 IST