‘आ म्ही मॅरेथॉनमध्ये धावायला जातो’, असे कोणालाही सांगितले की, ‘या वयात..?’ या दोन शब्दांनंतर ‘हे काय भलतंच काही तरी!’ असा भाव व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रियांचे आम्ही धनी असतो,’ डॉ. वैजयंती इंगवले दिलखुलासपणे सांगत होत्या.
म. गांधींच्या चळवळीत भाग घेतलेल्या आजोबांची ही नात, पुण्याचे पाणी. ठाण्यात तीन ठिकाणी बालरोगतज्ज्ञ म्हणून व्यवसाय, योगाचे वर्ग यात पूर्णपणे बुडून गेलेल्या. दिवसभरात कुठेही लिफ्टचा वापर न करता पाच-सहा मजले किती तरी वेळा धावतपळत चढणाऱ्या, तेही एक सोडून एक पायरी या नियमाने. डॉ. वैजयंती यांची ही धावाधाव बघून त्यांच्या मैत्रिणीने, डॉ. नीता यांनी आपल्याबरोबर त्यांचेही नाव मुंबई स्टॅण्डर्ड चार्टर्ड मॅरेथॉनसाठी नोंदवून टाकले. या पहिल्या अनुभवाने डॉ. वैजयंती यांना खूप मज्जा वाटली. तेव्हापासून गेली तीन-चार वर्षे मॅरेथॉनमध्ये भाग घेण्याचा हा सिलसिला चालूच आहे.
आयआयटीचे इंजिनीअर असून, सुरुवातीला स्टेट बँकेत व नंतर बहुराष्ट्रीय बँकेत काम करून निवृत्त झालेले वैजयंतीताईंचे यजमान दीपक इंगवले हे आपल्या पत्नीची ही ‘पळापळ’ पाहात होते. त्यांनाही पत्नीच्या साथीने पाऊल उचलावेसे वाटत होते, पण नोकरीतील कामाच्या स्वरूपामुळे धावण्याची जाऊ दे, चालण्याची क्षमताही ते हरवून बसले होते. चालताना दम लागत होता. पायावर सूज होती. ते किंकर्तव्यमूढ अवस्थेत असतानाच ‘धावत येई सख्या’ अशी डॉ. वैजयंती यांनी प्रेमळ साद घातली. त्या अनवट क्षणी ‘आपणही मॅरेथॉनमध्ये धावायचे’ असा मनाचा निर्धार करीत दीपक इंगवले यांनी प्रतिसाद दिला. त्यांचे सहजीवन असे ‘धावायला’ लागले.
दोघेही कुठल्याही ट्रेनरकडे मार्गदर्शनासाठी गेले नाहीत. वैद्यकीय ज्ञानाची पाश्र्वभूमी डॉ. वैजयंती यांच्याकडे होतीच. गुगलच्या मदतीने माहितीच्या खजिन्यांची दारे किलकिली झाली. ‘विवेकाचे फळ ते सुख, अविवेकाचे फळ ते दु:ख’, यात मानेल ते आवश्यक, केले पाहिजे, या समर्थ विचारांची सोबत होतीच. हृदयाला त्रास न देता, स्नायूंना जास्तीत जास्त प्राणवायू कसा पुरवायचा, श्वासोच्छ्वास कसा करायचा, प्राणायामाची जोड किती व कशी द्यायची, याचा विचार करीत आपापल्या तब्येतीनुसार, अनुभवाला सामोरे जात दोघे प्रयोग करीत गेले. अभ्यासयुक्त आहाराचे नियोजन करून वजन न वाढविता, क्षमता वाढविण्यावर भर दिला. फक्त ‘योग’न अनुसरता व्यायामालाही जवळ केले. आपली क्षमता तिथे तपासता येऊ लागली. धावणे म्हणजे पायांकडेच फक्त लक्ष दिले की झाले, असा समज असतो. मात्र, धावताना हात दुखण्याच्या तक्रारी वाढू लागल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की धावणे म्हणजे नियंत्रित उडय़ाच. मेंदूसकट सगळ्या शरीराचा त्यात सहभाग. मग हाताच्या बोटांपासून पायाच्या बोटांपर्यंत सगळ्या अवयवांना व्यायामाचा खुराक घ्यायला सुरुवात केली. स्वत:शीच स्पर्धा सुरू झाली. आपण प्रगतिपथावर आहोत हे जाणवल्यामुळे दीपक इंगवले यांचा उत्साह वाढू लागला.
फेब्रुवारी २०१३ मध्ये हिरानंदानी येथील मॅरेथॉन स्पर्धेसाठी डॉ. वैजयंती यांनी २१ किमी व दीपक यांनी ५ किमीसाठी नावे नोंदवली. सुदैवाने दीपक इंगवले यांना तेवढे अंतर चालणे शक्य झाले आणि त्यांनी यशाची पहिली पायरी चढली. ज्यांना चालताही येत नव्हते ते चालता चालता चक्क पळूही लागले. नकळत धावण्याचे अंतर ५ , १०, २१ किमी असे वाढत गेले. वेळेच्या नोंदीने उतरती भाजणी स्वीकारली. तीन वर्षांत वजनही १२ किलोने कमी झाले. शारीरिक क्षमता कमी असूनही जितक्या अंतरासाठी नावनोंदणी केली, तितके अंतर धावता आले नाही, अर्धवट सोडावे लागले, असे एकदाही घडले नाही. ही गोष्ट दीपक इंगवले यांच्यासाठी अत्यंत आनंदाची होती. हळूहळू डॉ. वैजयंती यांच्याबरोबर दर रविवारी येऊरच्या टेकडीवरही ते जाऊ लागले.
गेल्या साडेतीन वर्षांत या दोघांनी ठाणे, पुणे, मुंबई, वसई, गोवा, सातारा, बंगलोर, चेन्नई, नाशिक अशा ठिकाणच्या २६ मॅरेथॉनमध्ये भाग घेतला आहे. डॉ. वैजयंती यांनी २१ किमीच्या १३ स्पर्धात भाग घेऊन त्यांच्या वयोगटामध्ये सलग आठ वेळा बक्षिसे मिळवली आहेत.मलेशियामधील कुचिंग येथे दोघे नुकतेच धावून आले आहेत. जिम कॉर्बेटच्या जंगलातली स्पर्धा किंवा नॉयडा येथील कार रेसच्या उंच-सखल, नागमोडी ट्रॅकवर भर पावसात धावण्याची स्पर्धा, त्यातला आनंद दोघे विसरूच शकत नाहीत.
एक मॅरेथॉन धावून आले की, लगेच पुढची मॅरेथॉन कुठे आहे याचा गुगलवर शोध घ्यायचा आणि लगेच नावनोंदणी करायची हा छंदच दोघांना लागला आहे. ‘धावतपळत’ आजूबाजूची प्रेक्षणीय स्थळेही बघून होतात. मॅरेथॉन स्पर्धेमुळे चालण्यात इतकी सहजता आली की, गोव्याचे १०-१० किमीचे ‘बीच’ असोत, जिम कॉर्बेटचे जंगल असो की कोणताही भू-प्रदेश असो परस्परांच्या सहवासात सभोवतालचा परिसर मनसोक्त न्याहाळण्याचा आनंद घेता येतो. शारीरिक स्वास्थ्यामुळे मानसिक स्वास्थ्यही सुधारते. सुमधुर संगीत ऐकत एक लय पकडून पळत राहणे हे जणू काही ध्यानच आहे, असे डॉ. वैजयंती यांना वाटते. साहजिकच ध्यानामुळे शरीर व मनाचा तंबोरा सुरेल वाजत राहतो. या दोघांच्या जोडीने धावणे हे अनेकांना स्फूर्तिदायक ठरत आहे.
कोणे एके काळी ‘आपण जिंकलो’ हे सांगण्यासाठी ग्रीस देशातील एक सैनिक अत्यानंदाने मॅरेथॉन ते अथेन्स हे अंतर धावत पार केले आणि शेवटी कोसळून मरण पावला. या घटनेची स्मृती ठेवण्यासाठी मॅरेथॉन स्पर्धा सुरू झाल्या. ‘पाउले चालती मॅरेथॉनची वाट’ म्हणत या स्पर्धेत भाग घेतल्यामुळे इंगवले दाम्पत्याला इथेच आरोग्यदायी सहजीवनाचा सूर गवसला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– सुचित्रा साठे

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on marathon marathon
First published on: 03-12-2015 at 00:58 IST